अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे निधन, बदल्यांच्या राजकारणातून तणावाखाली ह्रदयविकाराचा झटका

0
446

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड (वय-५३) यांचे आज सकाळी ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. मुळचे माढा (सोलापूर) चे शेतकरी कुटुंबातील गायकवाड यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. 

अत्यंत मनमिळावु, अभ्यासु, कार्यक्षम असलेले गायकवाड हे तीन वर्षापुर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेत सह आयुक्त म्हणून कार्यरत होते. सलग सहा वर्षे ते त्या पदावर होते. आजी-माजी नगरसेवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती होती. भोसरी विधानसभा मतदारसंघात नोंदणी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. तीन वर्षापुर्वी त्यांची सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी पदी बदली झाली होती. त्यानंतर नऊ महिन्यापुर्वी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून बदलून आले होते. गेल्याच आठवड्यात त्यांच्या जागेवर अचानक दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश आले. त्यांची बदली पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून केल्याचे आदेश महसुल विभागातून आले होते. त्या विरोधात गायकवाड यांनी थेट मॅटमध्ये दाद मागितली होती. तिथे त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली. मॅटच्या आदेशानंतर त्यांना पुन्हा पदभार देण्यास टाळाटाळ सुरू होती. त्यामुळे गायकवाड हे सतत तणावाखाली होते, असे त्यांचे सहकारी सांगत आहेत. आज सकाळी त्यांना ह्रयविकाराचा झटका आला आणु त्यांची प्राणज्योत मालवली. अचानाक झालेल्या बदलीच्या राजकारणात सतत तणावाखाली असल्याने त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात होत आहे.