ए आय एस एस एम एस अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनाचे आयोजन!

0
217

पिंपरी, दि. 2 (पीसीबी) : “आज खरा प्रश्न मराठी भाषेच्या अस्तित्वाचा नसून मराठी भाषेच्या प्रतिष्ठेचा आहे .आपल्या मातृभाषेला प्रतिष्ठा मिळवून देणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य असायला हवे. आज जगाच्या पाठीवर जवळपास दहा कोटी लोक मराठी भाषा बोलतात त्यामुळे मराठी भाषेचे अस्तित्व निश्चित टिकून राहील प्रश्न आहे त्या भाषेच्या प्रतिष्ठेचा!’ असे विचार ख्यातनाम साहित्यिक ज्येष्ठ पत्रकार आणि केसरी या वृत्तपत्राचे वृत्त संपादक स्वप्नील पोरे यांनी व्यक्त केले. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित मराठी राजभाषा दिन या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .ते पुढे असे म्हणाले “मराठी भाषेचा समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा लक्षात घेता या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा खरंतर यापूर्वीच मिळायला हवा होता .भाषा टिकवणे म्हणजेच संस्कृती टिकवणे असते. आपण सर्व मराठी भाषा प्रेमींनी या भाषेची प्रतिष्ठा वाढविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवा .”

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एस बोरमने यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमात देखील मातृभाषेतून शिक्षण मिळायला हवे असे विचार व्यक्त केले. महाविद्यालयाच्या ग्रंथालय आणि मिडीया विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्नेहा करंदीकर हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर ग्रंथपाल वृषाली दंडवते यांनी आभारप्रदर्शन व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर मनिशा कोंढरे ,डी एस कुलकर्णी, रजस उसगावकर आणि वेदांत काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.