ठाकरे यांचे फॅमिली फ्रेंड ‘रविंद्र वायकर’ नेमके कोण आहेत ?

0
264

मुंबई, दि.३ (पीसीबी) : शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासोबत रायगड जिल्ह्यात बेकायदेशीरपणे जमीन खरेदी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे रवींद्र वायकर अडचणीत आले आहेत. रविंद्र वायकर यांचा राजकीय प्रवास हेसुध्दा एक मोठे गूढ आहे. भाजपने आता त्याची खोदाई सुरू केली असून नवनवे आरोप सुरु केले आहेत. तायासाठी वायकर यांची कारकिर्द जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजीनामा दिलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या रिक्त जागेवर वायकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

रवींद्र दत्ताराम वायकर हे 62 वर्षाचे आहेत. साधा शिवसैनिक ते गृह निर्माण राज्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी मुंबई महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक म्हणून काम पाहिलं आहे. 1992मध्ये ते जोगेश्वरीतून पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले होते. त्यानंतर ते 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत. या काळात ते सलग तीन वेळा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षही होते.

मुंबई महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक राहिलेल्या वायकर यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. प्रशासनाकडून काम करून घेण्याची त्यांची हातोटी आहे. महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची त्यांच्यावर खास मर्जी असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते आणि विश्वासू सहकारी म्हणून वायकर यांची ओळख आहे. त्यांची काम करण्याची प्रवृत्ती आणि अभ्यासूपणा यामुळेच ते उद्धव ठाकरे यांच्या खास जवळचे आहेत.

2014 मध्ये युतीचं सरकार राज्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र वायकर यांची गृहराज्य मंत्रिपदी वर्णी लावण्यात आली होती. आपल्या कार्यकाळात वायकर यांनी गृहनिर्माण धोरण अधिक सोपं करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार आल्यानंतर वायकर यांना कॅबिनेटपदी बढती मिळेल अशी शक्यता होती. परंतु, रवींद्र वायकर यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे वायकर प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना ऑफिस का चीफ कोऑर्डिनेटर करून त्यांची नाराजी दूर केली आहे. वायकर यांची ही नियुक्ती केल्याने शिवसेनाला अनेक फायदे होणार आहेत. शिवसेनेच्या आमदारांच्या कामाला गती मिळेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटता येत नाही, कामं होत नाहीत अशी तक्रार करण्याचा आमदारांना वाव उरणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या कामाचं विकेंद्रीकरण झाल्याने पक्ष हिताच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल, मुख्यमंत्री कार्यालयावर कुठलाही आरोप झाला तर त्यासाठी थेट उद्धव ठाकरेंवर ठपका ठेवता येणार नाही म्हणून वायकर यांची ही नियुक्ती करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

पहिल्यांदा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आरोप केला होता. वायकर आणि मातोश्रीचे आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप निरुपम यांनी केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र निरुपम यांना हे आरोप सिद्ध करता आले नव्हते. आरे कॉलनीत बेकायदा जिमखाना व ४० खोल्या असलेली इमारत बांधल्याचा आरोपही संजय निरुपम यांनी केला होता. २० एकर जागेत जिमखाना व ४० खोल्या असलेल्या इमारतीचे बेकायदा बांधकाम केल्याचा दावा निरुपम यांनी केला होता. या प्रकरणी लोकायुक्त एम. एल. टाहलियानी यांच्यापुढे सुनावणी झाली होती. त्यावर तपासाचे आदेश देण्यास लोकायुक्तांनी नकार दिला होता. मात्र, जिमखान्याची जागा परत घेऊन आदिवासी व झोपडपट्टीवासीयांसाठी त्याचा वापर करण्यात यावा, असे लोकायुक्तांनी स्पष्ट केले होते. तर, वायकर यांनी आपली बदनामी केली जात असल्याचे सांगून निरुपम यांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरुद्ध १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.

अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांची पत्नी मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली होती.

सोमय्यांच्या या आरोपांवर वायकरांनी पलटवार केला होता. हे फाल्तू आरोप आहेत. कुणी कुणाकडून जमीन घेऊ शकत नाही का? हा माझा पहिला प्रश्न आहे. जमीन घेतलेली आहे. त्याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला दाखवली आहे. इन्कम टॅक्समध्ये त्याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे जमीन घेतली आणि त्याची माहिती लपवून राहिली, असा प्रश्नच येत नाही. जमीन घेतलेली आहे”, असं वायकर म्हणाले होते. ठाकरे आणि वायकर कुटुंब एकत्र व्यव्हार का करु शकत नाहीत? उद्धव ठाकरे माझे नेते आहेत. तुम्ही चौकशी करा आम्ही किती जमीन एकत्र घेतली आहे. त्याबाबत इन्कम टॅक्सला माहिती दिली आहे. आता त्याची माहिती सोमय्यांना द्यायला हवी का?, असा सवालही त्यांनी केला होता.