अवयवदाना मुळे मिळाले नव’जीवन’

0
290

पिंपरी, दि.३ (पीसीबी) – नुकत्याच 55 वर्षीय महिलेला उपचारांसाठी पिंपरीच्या डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपचारां दरम्यान त्यांना मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले होते. त्यानंतर मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदी नुसार रुग्णाच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी रुग्णालयातील अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक यांनी समुपदेशन केले. व रुग्णाच्या नातेवाईकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. कुटूंबावर कोसळलेल्या दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेन डेड रुग्णाचे मुलगा व मुलगी यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या धाडसी निर्णयामुळे पाच जणांना नवजीवन. विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या नियमानुसार व प्रतीक्षा यादीप्रमाणे यकृत, दोन नेत्रपटल, दोन मूत्रपिंड, हे अवयव गरजू रुग्णापर्यंत पोचविण्यात आले यामध्ये एक मूत्रपिंड आणि यकृत हे डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात तर बाकीच्या अवयवांचे प्रत्यारोपण पुण्यातील इतर रुग्णालयात करण्यात आले.

अवयवदात्याच्या नातेवाईकांचा निर्णय तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेगवान कृतीमुळे या इतर रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत झाली. जीवनदान देण्याची किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी साधली.

“कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल व त्यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उप कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी आभार मानले. नातेवाईकांच्या दुःखात आम्ही ही सहभागी आहोत. अवयवदान हे एक पुण्यकर्म आहे. याबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचे आज दिसून येत आहे.”.असे मत डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी व्यक्त केले.

या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो अशी भावना डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली त्यांनी अवयवदात्याच्या नातेवाईकांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले “अवयवदान व प्रत्यारोपणाबाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी बाब आहे. परंतु अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयवदाते यांच्या संख्येत अजुनही प्रचंड तफावत आहे. म्हणूनच अवयवदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे”.