एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो; एक दिवसाचा पंतप्रधानही होईन- अनिल कपूर

0
934

पणजी, दि. २८ (पीसीबी) – नायक सिनेमात एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो होतो. संधी मिळाली तर एक दिवसाचा पंतप्रधानही होईन, अशी इच्छा बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी इफ्फीमध्ये बोलून दाखवली. गोव्यात सुरू असलेल्या ४९व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वसवात ‘मास्टर क्लास विथ मु. इंडिया’ या सत्रात अभिनेता अनिल कपूरची मुलाखत त्यांचीच मुलगी रिया कपूरने घेतली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या ३८ वर्षांच्या सिनेकारकीर्दीचा इतिहास उलगडला. तसेच मिस्टर इंडियासारख्या सुपरहिरोवर आधारित सिनेमा पुन्हा तयार होणार असेल तर तो करायला मला आवडेल, असेही ते म्हणाले.

अनिल कपूर यांनी सांगितले की, “पुण्यातील एफटीआयआयसारख्या संस्थेतून अनेक कलाकार तयार झाले. मीही त्यातूनच तयार झालेला अभिनेता आहे, असे सांगून मी सिनेमासाठी काम शोधत गेलो नाही, उलट त्या भूमिकांसाठी माझा शोध घेतला गेला. कॅमेऱ्याला सामोरे जाण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी इंडस्ट्रीचा आभारी आहे.”

वयाच्या साठीतही हॅण्डसम दिसणाऱ्या अनिल कपूर यांनी उपस्थितांना काही टिप्स दिल्या. कधी कधी स्वत:च्या लूकवर मेहनत घ्या, अन्यथा या इंडस्ट्रीतील लोक, लेखक, दिग्दर्शक आणि प्रेक्षकही तुम्हाला विसरू शकतात. तुम्ही फिट राहा. आनंदी राहा हाच तुमच्या यशचा फॉर्म्युला आहे. मी आजही मॅरेथॉनमध्ये भाग घेतो. मी कामाला प्राधान्य देतो, असा कानमंत्र त्यांनी दिला.