एकाच दिवशी पु ना गाडगीळच्या दोन शाखांमधून सोन्याचे दागिने पळवले

0
405

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – पु ना गाडगीळ अँड सन्स या सराफ दुकानाच्या दोन शाखांमधून एकाच दिवशी ग्राहक बनून आलेल्या महिलांनी दोन सोन्याच्या अंगठ्या हातचलाखीने पळवल्या. या दोन्ही घटना 25 नोव्हेंबर रोजी दुपारी चिंचवड आणि भोसरी येथील शाखांमध्ये घडल्या.

रतन आबाजी कांबळे (वय 28, रा. बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात एका अनोळखी महिलेच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास एक अनोळखी महिला भोसरी येथील पी एन गाडगीळ अँड सन्स या दुकानात ग्राहक बनून आली. त्या महिलेने अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांचे इतर ग्राहकांकडे लक्ष असल्याचा गैरफायदा घेऊन हातचलाखीने 62 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेतली. त्याजागी तिच्या हातातील सोन्याची पॉलिश केलेली अंगठी ठेऊन फसवणूक केली.

यापूर्वी मीनाक्षी अतुल दाभाडे (वय 49, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात एका अनोळखी महिलेच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मीनाक्षी या चिंचवडगाव येथील पु ना गाडगीळ अँड सन्स या सराफी दुकानात सेल्समन म्हणून काम करतात. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या कालावधीत एक अनोळखी महिला दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने आली. तिने हातचलाखी करून दुकानातील ट्रे मधील 11.880 ग्रॅम वजनाची 50 हजार रुपये किमतीची शिव प्रतिज्ञा कोरलेली सोन्याची अंगठी चोरली. त्या अंगठीच्या जागी पांढरे खडे असलेली व बारकोड लावलेली नकली अंगठी ठेऊन निघून गेली.

एकाच दिवशी या दोन्ही घटना घडल्या आहेत. याबरोबरच एका अनोळखी महिलेने चाकण येथील चंदूकाका सराफ या दुकानातून 38 हजार 600 रुपयांची सोन्याची अंगठी चोरून नेली. तिनेही चोरलेल्या अंगठीच्या जागी नकली अंगठी ठेवली. प्रतिथयश असलेल्या या सुवर्ण पेढ्यांमध्ये अशा प्रकारे चोरी आणि फसवणुकीचे प्रकार होत असल्याने सराफ दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दुकानात कामगारांचे पुरेसे लक्ष नसल्याचे तसेच दुकानातील सुरक्षा व्यवस्था देखील ढिसाळ असल्याचे दिसून येत आहे.