एकनाथ पवार, दत्ता साने, राहुल कलाटे “डेंजर झोन”मध्ये; तिघांचीही पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता

0
1014

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणात अनेक उलथापालथी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सत्तारूढ भाजपचे पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्या पदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दत्ता साने यांना विरोधी पक्षनेतेपद सोडावे लागू शकते. दुसरीकडे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार हे निष्क्रिय ठरल्यामुळे पक्षातूनच त्यांना विरोध होत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी किंवा नंतर सत्तारूढ पक्षनेतेपदी भाजपकडून दुसऱ्या नगरसेवकाला संधी मिळू शकते. तसेच शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी स्वतःबाबत पक्षात अविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे मातोश्रीकडून नवीन गटनेता निवडीची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे समजते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी २०१७ मध्ये भाजप सत्ताधीश बनला. त्यामुळे महापालिकेतील राष्ट्रवादीची दहा वर्षांची सत्ता जाऊन भाजपच्या कारभाराला अडीच वर्षे पूर्ण होत आली आहेत. नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा गुरूवारी (दि. २३) निकाल आहे. निकालानंतर सर्वपक्षीय राजकारणी पुन्हा महापालिकेतील राजकारणाकडे लक्ष केंद्रित करतील. लोकसभेचा निकाल काहीही लागो पण महापालिकेच्या राजकारणात अनेक उलथापालथी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सत्तारूढ भाजपचे पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना राजकीय झटका बसणार असल्याचे महापालिका वर्तुळात बोलले जात आहे.

महापालिकेत विरोधी बाकावर बसलेल्या राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. भाजपच्या सत्तेला वेसण घालण्यासाठी राष्ट्रवादीने सुरूवातीला अनुभवी नगरसेवक योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतपद दिले. त्यांनी अभ्यासूपणाच्या जोरावर सत्तारूढ भाजपला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी होत असल्याचे चित्र निर्माण होण्यापूर्वीच स्वपक्षीय नगरसेवकांनी बहल यांनाच जेरीस आणून विरोधी पक्षनेतपद सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर राष्ट्रवादीत विरोधी पक्षनेतेपद कळीचा मुद्दा बनला. त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांनी डोकेदुखी म्हणून पाच वर्षांत पाच नगरसेवकांना हे पद देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दुसऱ्या वर्षी चिखली भागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांना विरोधी पक्षनेते करण्यात आले. त्यांचा एक वर्षांचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर साने यांच्या जागेवर राष्ट्रवादीच्या अन्य नगरसेवकाला संधी मिळणे अपेक्षित आहे.

विरोधी पक्षनेत्यांसोबतच सत्तारूढ भाजपचे पक्षनेते एकनाथ पवार यांची देखील पदावरून गच्छंती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकनाथ पवार हे निष्क्रिय ठरल्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांचाच त्यांना मोठा विरोध आहे. पक्षनेतेपदाचे एक वर्ष पूर्ण होताच एकनाथ पवार यांना पदावरून हटवण्याची रणनिती तयार करण्यात आली होती. परंतु, वरिष्ठ नेत्यांची मर्जी संपादन करण्यात यश आल्याने पवार यांना जीवदान मिळाले होते. त्यानंतर देखील पवार यांच्या कार्यशैलीत कोणताही बदल झालेला नाही. स्वपक्षाच्या नगरसेवकांना विश्वासात न घेता सभागृह चालवणे, मनमानी कारभार करणे, स्वपक्षापेक्षा विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनाच खुष करण्यात धन्यता मानणे, कामचुकार अधिकाऱ्यांची अर्थपूर्ण तळी उचलणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्यांच्या प्रकरणावरून पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप होणे, अशा प्रकारच्या कार्यशैलीमुळे एकनाथ पवार यांच्याविषयी भाजपच्याच नगरसेवकांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातून पक्षाच्या बैठकीत एकनाथ पवार यांचे स्वपक्षाच्या अनेक नगरसेवकांसोबत खटके देखील उडाले आहेत. त्यामुळे एकनाथ पवार यांच्या पक्षनेतेपदावर देखील विधानसभा निवडणुकीच्या आधी किंवा नंतर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विरोधी पक्षनेते आणि सत्तारूढ पक्षनेत्यांच्या आधी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांची या पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता अधिक आहे. राहुल कलाटे यांनी आपल्याच पक्षात स्वतःबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण केलेले आहे. लोकसभा निवडणुकीत ते पक्ष प्रचारात फारसे सक्रिय नव्हते. खासदार श्रीरंग बारणे आणि राहुल कलाटे यांच्यातील राजकीय वितुष्ट सर्वश्रुत आहे. त्याचाही त्यांना राजकीय फटका बसण्याची राजकीय चिन्हे आहेत. मातोश्रीकडून शिवसेनेचा नवीन गटनेता निवडीची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे समजते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महापालिकेच्या राजकारणात काय काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.