“एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये वादळ?”

0
398

थर्ड आय – अविनाश चिलेकर –

आयुष्याची तब्बल ४० वर्षे भाजपमध्ये गेल्यानंतर माजी मंत्री जेष्ठ नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कऱत आहेत. भाजपचे संघटन महाराष्ट्रात रुजविण्यात खडसे यांचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. भाजप-शिवसेना युतीची सत्ता राज्यात आली होती त्यातही त्यांचे योगदान होते. खांदेशात खडसे नावाचा दबदबा आजही कायम आहे. अशा परिस्थितीत त्यांनी भाजप सोडला कारण त्यांची घुसमट होत होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना टार्गेट केल्याचे आता खडसे उघडपणे बोलतात. भोसरी एमआयडीसी मध्ये जमीन खरेदी प्रकरणाचे फक्त निमित्त झाले. त्यातून त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला. गेले चार वर्षे खडसे अक्षरशः झुरत राहिले. माझ्यावर अन्याय झाला… अन्याय झाला… असे तुणतुणे वाजवत राहिले. अखेर त्यांची खदखद बाहेर आली. ज्या राष्ट्रवादीच्या कुंडल्या मांडून मैदान मारले त्याच राष्ट्रवादीशी त्यांनी घरोबा केला. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. नाही म्हटले तरी त्याचा परिणाम होणार. कारण ज्या ओबीसींच्या जीवावर भाजपने महाराष्ट्रात सत्तेचा सोपन सर केला त्याच बहुजन समाजाचा एक चेहरा अशी खडसेंची जुनी ओळख आहे. खडसे यांच्या जाण्यामुळे भाजपमध्ये पडझड होणार. फडणवीस यांनी खडसे यांच्या बरोबर पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखऱ बावनकुळे यांच्यासह अनेक आजी माजी आमदार, तोडीस तोड असलेल्या नेत्यांना कात्रजचा घाट दाखवला. आता खडसे यांच्या निमित्ताने कोंडी फुडली. काही आजी-माजी आमदार, आमदारकीच्या तोडीचे नेतेसुध्दा त्या वाटेवर आहेत. भाजपला गळती लागली तरी वाईट वाटू नये अशी परिस्थिती आहे. कुठे कुठे काय परिणाम होईल ते टप्याटप्याने दिसेल. जळगाव महापालिका आणि जिल्हा परिषद भाजपच्या हातातून जाणार. भाजपचे १०-१२ नव्हे तर किमान २०-२५ आमदार आता राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पाठोपाठ पिंपरी चिंचवड शहरात भाजपला सर्वात मोठा दणका बसेल अशी दाट शक्यता आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला तडे जाणार ? –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड हा बालेकिल्ला. सलग वीस वर्षे दादा पवार आणि पिंपरी चिंचवड हे एक समिकरण होते. राज्यात आणि केंद्रात भाजपची हवा होती. काँग्रेस व राष्ट्रवादीचे जहाजाला जागोजागी भोक पडली होती. हे जहाज वाचणार नाही तर बुडणार असे लक्षात येताच अनेक संधीसाधून उंदरांनी बाहेर उडी मारली. वारे भाजपच्या दिशेने वाहते म्हटल्यावर अनेक बघे, टघे, भुरटे या कळपात घुसले. पाप केलेल्यांनी भाजपच्या गंगेत डुबकी मारली आणि ते पवित्र झाले. ज्या भाजपच्या कशाबशा दोन-चार जागा यायच्या त्या पक्षात प्रवेशासाठी रांगा लागल्या कारण सत्तेचा चमत्कार होता. एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत अनेकांचे प्रवेश झाले. आताचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी एका रात्रीत एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर जाऊन भाजप प्रवेश केला आणि सर्वांना धक्का दिला. खडसे यांचे कट्टर समर्थक खांदेशवासी आणि आताचे सत्ताधारी नेते नामदेव ढाके हे त्याचे साक्षिदार आहेत. आमदार जगताप आणि त्यांच्या जोडीला दुसरे अपक्ष आमदार यांनी अजित पवार यांच्या सत्तेला सुरूंग लावला. कधीही पराभव न पाहिलेल्या अजित पवार यांना स्वतःच्या बालेकिल्यात मान खाली घालायची वेळ आली. ते दुखणे, ती सल अजितदादा विसरले नाहीत. त्यांनी तो अपमान बंद पेटीत जपूण ठेवला आहे. आता तर खडसे त्यांच्या मदतीला आले. शहरात ढाके यांच्यासह अशोकभाई सोनवणे आणि सुमारे एक लाख मतदार हा खांदेशी आहे. खांदेश मित्र मंडळाचे मोठे प्रस्थ या शहरात आहे. खडसे यांचे समर्थकांची मोठी फळी इथे कार्यरत आहे, ती अर्थातच आता खडसे यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या मागे उभी राहणार. भाजपचा मोठा जनाधार घटणार. राज्यातील आघाडीचे सरकार टीकणार नाही यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. आता हे त्रांगडे पायात पाय असला तरी अगदी अडखळत नव्हे तर जोमात वाटचाल करणार अशी खात्री पटू लागली. त्यामुळे आगामी काळात आताची भाजपच्या हातातील महापालिकेची सत्ता पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार असे भाजपचेच लोक सांगतात. भाजपमधील अनेक रथीमहारथी आता पुन्हा राष्ट्रवादीत जायच्या तयारीत आहेत, फक्त पहिले आप पहिले आप सुरू आहे. विकास करायचा तर सत्तेची कास धरून चालले पाहिजे, मग ती सत्ता कोणाची का असेना. शरद पवार यांचे हे सूत्र आहे आणि त्यांच्या चेल्यांनाही ते अवगत आहे. खडसे यांच्यामुळे ज्या काही राजकीय घडामोडी होतील त्यात पिंपरी चिंचवड हे केंद्र स्थानी असेल. ज्या भोसरी (जमीन घोटाळा) मुळे खडसे यांच्या नावाला बट्टा लागला, पतन झाले त्याच भोसरीत राजकीय समुद्रमंथन होऊन कदाचीत पुन्हा खडसे यांचा जिर्णोध्दार होऊ शकतो. शहरातील भाजपची सद्दी संपविण्याची ही सुवर्ण संधी अजित पवार यांना चालून आली आहे. त्यांनी ती साधली नाही तर त्यांच्या सारखे करंटे तेच ठरतील.

अन्यथा स्मार्ट सिटी घोटाळा बाहेर येईल –
महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असतानाच्या काळात जवाहरलाल नेहरू नागरी पुर्ननिर्माण योजनेतील (जेएनएनयूआरएम) भ्रष्ट्राचाराची टिमकी वाजवत भाजप सत्तेवर आला. झोपडपट्टी पुनर्वसन, बीआरटी, भुयारी गटार, पाणी पुरवठा, रस्ते सिमेंटीकरण, पावसाळी गटर्स, उड्डाण पुल आदी कामांतील भ्रष्ट्राचार त्यावेळी गाजला. पालखी सोहळ्यातील दिंडी चालकांना भेट द्यावयाची विठ्ठल रुक्मिनी मुर्ती १५०० ची ४००० ला खरेदी केल्याच्या प्रकरणात तमाम जनतेचे माथे भडकले. राष्ट्रवादीच्या लोकांनी देवसुध्दा सोडला नाही, असे म्हणत नागरिकांनी वज्रमुठ करत सत्तांतर घडवून आणले. त्याचा आयता लाभ भाजपला झाला. नको नको भानामती, नको बारामती तसेच भय, भ्रष्टाचार मुक्त शहर अशी खोटी स्वप्न दाखवून भाजप सत्तेत आली. गेल्या तीन वर्षांत प्रत्यक्षात लोकांचा खूप मोठा अपेक्षाभंग झाला. राष्ट्रवादीपेक्षा दामदुप्पट भ्रष्टाचार भाजपच्या नेत्यांनी केला. भ्रष्टाचाराचे एक एक प्रकरण वर्तमानपत्रांतून गाजते आहे. डोळे पांडरे होतील एतका पैसा मुरला, पाट वाहिला. आता हे गळू ठसठसते आहे. राज्यातील आघाडी सरकराकडे त्याबाबतच्या शेकडो तक्रारी गेल्या आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रडारवर ही महापालिका आहे. चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लागले तर भलभले जेलमध्ये जातील. हे सर्व टाळण्यासाठी राजकीय अभय मिळावे म्हणून पुन्हा स्वगही म्हणजे राष्ट्रवादीत सत्तांतर हा राजमार्ग आहे. खडसे यांना रस्ता दाखवला आहे. त्याच वाटने मंडळी भाजपला रामराम करून पुन्हा राष्ट्रवादीत येतील अशी शक्यता आहे. आले नाहीच तर त्यांची कुंडली तयार आहे.