एकनाथ खडसे यांचा भाजप सदत्वाचा राजीनामा, राष्ट्रवादी प्रवेश ठरला

0
664

जळगाव, दि. 18 (पीसीबी) : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे आता निश्चित झाले आहे. खडसे यांनी भाजपच्या सदत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशचा मुहूर्त गुरुवारी (ता.22) चा ठरला आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी आज माध्यम प्रतिनिधिना ही माहिती दिली आहे.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची मागील काही काळापासून चर्चा सुरू आहे. त्याबाबत अनेक मुहूर्त सांगण्यात आले. मात्र, हे मुहूर्त आपण दिले नसल्याचे सांगून खडसे यांनी स्पष्ट नकार दिला होता. आता त्यांच्याच निकटवर्तीयांनी गुरुवारी (ता.22)  खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविला आहे. तसेच काल (ता.17) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांनी थेट भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्याचवेळी त्यांच्या प्रवेशाचे निश्चित झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

खडसे यांच्या निकटवर्तीयांनी गुरुवारी होणाऱ्या प्रवेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिाऱ्यांना दूरध्वनी करून माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे गुरुवारी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश निश्चित झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत स्वतः खडसे यांनी अधिकृत पक्ष राजीनामा व राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची घोषणा अद्यापपर्यंत केलेली नाही. त्यांचे निकटवर्तीय मात्र गुरुवारी होणाऱ्या प्रवेशाची माहिती आता देऊ लागले आहेत. 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर आले असताना त्यांची भेट टाळणारे एकनाथ खडसे यांनी काल (ता. 17 ऑक्‍टोबर) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांची मात्र आवर्जून भेट घेतली होती. 
रावेरमध्ये घडलेल्या हत्याकांडातील कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे काल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहात खडसे यांनी देशमुखांची भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली होती. मात्र, खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी गृहमंत्री देशमुख यांची भेट घेणे, याला विशेष महत्त्व होते. 

दरम्यान, फडणवीस हे 13 ऑक्‍टोबरला जळगावच्या दौऱ्यावर आले होते. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाउंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी महाजन यांनी खडसे यांना निमंत्रण देऊनही ते फडणवीस यांच्या कार्यक्रमाला गेले नव्हते.