राष्ट्रवादीत असताना नेहमी गर्दीत असलेले हे नेते आज खड्यासारखे बाजूला पडलेत – रोहित पवार

0
235

मुंबई,दि.१८(पीसीबी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातल्या ऐतिहासिक सभेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय. त्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते सातारच्या ऐतिहासिक सभेच्या आठवणी जागवत आहेत. शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनीही साताऱ्यातील पावसातल्या सभेच्या आठवणींना उजाळा देत भाजपला चिमटे काढले आहेत.

आज बरोबर एक वर्ष झालं त्या घटनेला, ज्या घटनेची नोंद राज्याच्या राजकीय इतिहासात ठळकपणे झालीच पण विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फेरलं गेलं. ती ऐतिहासिक घटना म्हणजे माझं दैवत आदरणीय साहेबांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली जाहीर सभा. काही घटनाक्रम हे मनःपटलावर कायमचे कोरले जात असतात. त्यातील ही एक महत्वाची घटना असल्याचं रोहित पवार म्हणाले.

“साताऱ्यातील शरद पवारांचं भाषण ऐकायचा मोह खुद्द वरुणराजाला देखील आवरला नाही. वरुन मेघराजा बरसत होता आणि त्याच जलधारा अंगावर घेत व्यासपीठावर ८० वर्षाचा तरुण जाणता राजा गर्जत होता. पण साहेबांचे विचार ऐकण्यासाठी झालेली अलोट गर्दी किंचितही विचलित न होता स्तब्ध होती. साहेबांचा एक एक शब्द कानात साठवून ठेवत होती. साहेबांनी जाहीरपणे चूक कबूल करत ती दुरुस्त करण्याची साद जनसमुदायाला घातली आणि पुढं काय झालं हे आपल्याला माहीतच आहे”, असं म्हणत रोहित यांनी उदयनराजेंना टोला लगावलाय.

गेल्या विधानसभेवेळी राष्ट्रवादीतून अनेक नेते शिवसेना भाजपमध्ये जात होते. अनेक नेत्यांच्या पक्षांतरानंतर पवारांच्या सोबत कुणी रहायला तयार नाही, अशी टीका विरोधक करत होते. यावर बोलताना विरोध पवार म्हणाले, “स्वार्थासाठी अडचणीच्या काळात पक्षाला दगा देणाऱ्या त्या नेत्यांचं अस्तित्वही आज कुठं दिसत नाही. लोकांनीच त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. राष्ट्रवादीत असताना नेहमी गर्दीत असलेले हे नेते आज खड्यासारखे बाजूला पडलेत”.

पुढे रोहित पवार म्हणतात, “राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नेत्यांना भरभरुन दिलं तरीही गेल्या वर्षीच्या तथाकथित महाजनादेशाच्या लाटेला भुलून अनेकांनी कृतघ्नपणा केला. पण स्वार्थासाठी अडचणीच्या काळात पक्षाला दगा देणाऱ्या त्या नेत्यांचं अस्तित्वही आज कुठं दिसत नाही. लोकांनीच त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. राष्ट्रवादीत असताना नेहमी गर्दीत असलेले हे नेते आज खड्यासारखे बाजूला पडलेत. यातील काहींकडं पद जरुर आहे पण लोकांमधील पत मात्र त्यांनी जरूर तपासून घ्यावी. कदाचित त्यांना एकटं पाडून त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचाही ते ज्या पक्षात आहेत त्यांचा हा डाव असू शकतो. काही का असेना पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र दगाबाजांना कधीही थारा देत नाही”.