ऊन्हाचा ‘ताप’ रावसाहेब दानवे रूग्णलयात दाखल

0
615

मुंबई, दि. १० (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब दानवे सोमवारी एका खासगी रुग्णालयात दाखल आहेत. ही माहिती मिळताच मंगळवारी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली असून त्याचा तपशील समजू शकला नाही. दरम्यान, लोकसभा रिंगणात उतरलेले दानवे यांचे जावई आमदार हर्षवर्धन जाधव यांना सत्तार पाठिंबा देणार का? अशी चर्चाही आता रंगू लागली आहे. 

जालना लोकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या दानवे यांना स्वत:च्या मतदारसंघासह प्रदेशाध्यक्ष म्हणूनही राज्यभर प्रचारार्थ जावे लागत आहे. जाहीरसभा, कॉर्नर बैठका, मेळावे यासाठी त्यांची दिवसरात्र धावपळ सुरू आहे. वाढत्या तापमानाचा फटका त्यांना बसला आहे. ऊन्हामुळे त्यांना ताप आला आहे. सोमवारी तपासणीसाठी ते दर्गा रोडवरील एका खासगी रुग्णालयात गेले असता डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देत उपाचार सुरू केले.

दानवे अॅडमीट असल्याची माहिती मिळताच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडले, शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनीही त्यांची भेट घेत विचारपूस केली.