पुरातन व प्राचीन शिल्पांची हानी केल्याने सलमान खानला नोटीस

0
505

भोपाळ, दि. १० (पीसीबी) – काही दिवसांपूर्वी सलमानच्या ‘दबंग ३’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शिवलिंग झाकण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा ‘दबंग ३’ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भारतीय पुरातत्व विभागानं सलमान खानला नोटीस धाडली आहे. मध्य प्रदेशच्या मांडू इथं ऐतिहासिक जल महालात उभारलेले दोन सेट हटविण्याचे आदेश पुरातत्व विभागाने दिले आहेत.

या आधीही पुरातत्व विभागाने निर्मात्यांना नोटीस बजावली होती. पण निर्मात्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. यावेळेस निर्मात्यांनी या आदेशाचं पालन न केल्यास शूटींग रद्द केली जाईल, असं या नोटीशीत म्हटलं आहे. तसंच, नर्मदा नदीजवळील किल्ल्यातील चित्रीकरणाचा सेट हलवताना तेथील प्राचीन मूर्तींचे नुकसान झाले असल्याचं तेथील स्थानिकांनी सांगितले.

‘पर्यटन विकास व्हावा या हेतूनं आम्ही चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी दिली होती. पण, जर चित्रीकरणादरम्यान काही चुकीचं घडलं असेल तर संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल,’ असं मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री विजयलक्ष्मी साधो यांनी स्पष्ट केलं आहे.