उर्से येथील फुड कार्निवल मॉलच्या कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करुन ५० हजारांच्या हफ्त्याची मागणी

0
854

तळेगाव, दि. १२ (पीसीबी) – पंन्नास हजारांचा हफ्ता देण्याची मागणी करत अज्ञात हल्लेखोरांनी  एका फूडमॉल मॅनेजर आणि तेथील कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. तसेच आमचा कांदा, बटाटा आणि दूध खरेदी केले नाही, तर जीवे ठार मारु अशी धमकी दिली. ही घटना सोमवार (दि.१०) सायंकाळी चारच्या सुमारास उर्से टोल नाक्याजवळील फूड कार्निवलमध्ये घडली.

याप्रकरणी फूड कार्निवलचे मॅनेजर सिराजउद्दीन अल्लाउद्दीन अन्सारी (वय ३२, रा. उर्से टोलनाका फूड कार्निवल, उर्से, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्से टोलनाक्याजवळ फूड कार्निवल नावाचे मॉल आहे. फिर्यादी अन्सारी हे त्या दुकानात मॅनेजर म्हणून काम करतात. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास अज्ञात हल्लेखोर या मॉलमध्ये घुसले. त्यांनी फूड कार्निवलचे मॅनेजर सिराजउद्दीन अन्सारी आणि तेथील कर्मचाऱ्यांना दुकानातील पाईप आणि कॅरेटने जबर मारहाण केली. तसेच तुम्ही आमचा कांदा, बटाटा आणि दुध का विकत घेत नाही असे बोलून शिवीगाळ करत ५० हजारांचा हफ्ता जर दिला नाही तर जीवे मारण्याची धमकी देऊन फरार झाले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत.