उद्याने सकाळ, सायंकाळ तीन तास खुली

0
436

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची उद्याने, बागा तब्बल दोन महिन्यानंतर खुली होणार आहेत. वैयक्तिक व्यायाम, एकट्याने खेळण्यासाठी सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास उद्याने खुली राहणार आहेत.
शहरातील सर्व बाजारपेठांतील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सुरु राहतील. शिवाय बाहेरील कर्मचाऱ्यांना शहरातील कंपन्यांमध्ये कामावर येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी काढले आहेत.

देशभरात अनलॉक 1 चा पहिला टप्पा सुरु आहे. अनलॉकमध्ये विविध सवलती देण्यात आल्या आहेत. पिंपरी महापालिकेने देखील विविध सवलती देत जनजीवन पुर्वपदावर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने 14 मार्चपासून बंद केलेली उद्याने पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व उद्याने, बागा नागरिकांसाठी सकाळी पाच ते आठ आणि दुपारी चार ते सायंकाळी सात पर्यंत खुली राहणार आहेत. तथापि, याठिकाणी फक्त वैयक्तिकरित्या करावयाचे व्यायाम प्रकार, एकट्याने खेळायचे खेळ (जॉगींग, धावणे, चालणे, योगासने, दोरीवरच्या उड्या) इत्यादींना मुभा असणार आहे.

शहरातील सर्व बाजारपेठांतील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. विनिर्दिष्ठ बाजारपेठातील दुकाने पी 1- पी 2 तत्वानुसार सुरु राहतील. रस्त्याच्या एका बाजुची दुकाने सम तारखेस उघडी राहतील. तर, दुस-या बाजुची दुकाने विषम तारखेस उघडी राहतील. या बाजारपेठामध्ये ज्या बाजुची दुकाने सुरु असतील. त्याच्या विरुद्ध बाजुस वाहनांचे पार्किंग करण्यात यावे. जेणेकरुन सुरु असलेल्या दुकानांसमोरील जागा, सुरक्षित अंतराच्या निकषासह ग्राहकांना वापरता येईल.

दुकाने सकाळी सातपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहतील. याची अमंलबजावणी सोमवारपासून सुरु झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व औद्योगिक, आयटी, खासगी आस्थापनामध्ये कामवार उपस्थित राहण्यासाठी शहराबाहेरील प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त भागातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात येताना चारचाकी, वैयक्तिक वाहन किंवा कंपनीचे वाहन असल्याबाबत वैयक्तिक प्रतिज्ञापत्र अतिरिक्त आयुक्त दोन अजित पवार यांच्याकडे पाठवून परवानगी घेता येणार आहे.