ऑनर लिकींग प्रकऱणात सहा जणांवर गुन्हा दाखल; दोघांना अटक

0
362

पिंपळे सौदागर, दि. ९ (पीसीबी) – प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा खून करण्यात आला. या खून प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात सहा जणांवर ऍट्रासिटीसह खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि.7) रात्री घडली.

विराज विलास जगताप (वय 18) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा काका जितेश वसंत जगताप (वय 45, रा. जगताप नगर, बुद्ध विहार जवळ, पिंपळे सौदागर) यांनी सोमवारी (दि. 8) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह रोहित जगदीश काटे, कैलास मुरलीधर काटे, जगदीश मुरलीधर काटे, हर्षद कैलास काटे (सर्व रा. पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विराज याचे आरोपीच्या नातेवाईक तरुणीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून विराज याला मारण्याचा कट रचला. रविवारी (दि. 7) रात्री दहा वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील शिव बेकरीजवळ विराज हा दुचाकीवरून चालला असताना आरोपींनी त्याच्या दुचाकीला टेम्पोने पाठीमागून धडक दिली.

सर्व आरोपी विराजला मारण्यासाठी टेम्पोतून खाली उतरल्याचे बघून घाबरलेला विराज हा पळून जाऊ लागला. त्यावेळी हेमंत काटे याने लोखंडी रॉड विराजच्या डोक्‍यात मारला. सागर काटे याने पाठीत दगड मारला. रोहित काटे, कैलास काटे, हर्षद काटे, जगदीश काटे यांनी विराजचे हातपाय पकडले.

आरोपी जगदीश याने जातीवाचक बोलून विराज यांच्या अंगावर थुंकला. “आमच्या जातीच्या मुलीवर प्रेम करण्याची तुझी लायकी आहे का”, असे म्हणत त्यास जबर मारहाण करून तिथेच सोडून दिले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विराज याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अजय भोसले तपास करीत आहेत. दरम्यान, हे प्रकरण ऑनर किलींगचे असल्याचा काही कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे त्याला वेगळे वळण मिळण्याची शक्यता दिसत आहे.