उद्धव ठाकरेंसमोरील सर्वात मोठे राजकीय संकट दूर

0
591

 

मुंबई, दि.९ (पीसीबी) – लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात होणारी राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक काही दिवसांपूर्वी पुढे ढकलण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला. येत्या २४ एप्रिल रोजी राज्य विधानपरिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. विधानसभेतील आमदार या निवडणुकीत मतदान करतात. मात्र कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद अडचणीत आले होते.

मात्र उद्धव ठाकरेंवरील हे राजकीय संकट आता दूर झाले आहे. कारण राज्यपाल नियुक्त जागेवर उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात यावी, यासाठी आता कॅबिनेटकडून शिफारस करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माहिती दिली.

राज्यपाल नियुक्त रिक्त दोन जागा आहेत. त्यावर ठाकरे यांची नियुक्ती करावी, यासाठी आजची बैठक झाली की कॅबिनेट शिफारस करेल. यापूर्वी दोन जागांवर राष्ट्रवादीकडून आदिती नलावडे आणि गर्जे यांची नाव शिफारस केली होती. पण राज्यपालांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नव्हता. अशातच आता कॅबिनेटकडून एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन निवडणुकीची तारीख नंतर जाहीर करणार आहे. या स्थितीमुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला होता. कारण उद्धव ठाकरे हे विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. असं असताना त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना मुख्यमंत्रिपदावर ६ महिने राहता येते. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला २८ मे रोजी ६ महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे संवैधानिक पेच निर्माण झाला आहे. कारण निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर निवडणूक जाऊ शकत नाहीत. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती. मात्र आता राज्यपालांकडून नियुक्ती होणार असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासमोरील संकट दूर झाले आहे.