‘उद्धव ठाकरेंनी नेतृत्व केलं तर अभिमान असेल, पण…’ ; राऊतांच्या वक्तव्यावर कोल्हेंनी दिली प्रतिक्रिया

0
211

नवी दिल्ली, दि.२९ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नुकताच वाढदिवस पार पडला. त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छांवर विविध नेत्यांनी आतापर्यंत प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलंय. मला अभिमान असेल पण सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका आणि राष्ट्रवादीसह पक्षेश्रष्ठींची भूमिका काय असेल हे माहिती नाही पण ती महत्त्वाची असेल, असं अमोल कोल्हे म्हणाले.

संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल आशावादी असायला काहीच हरकत नाही. कोणती ही मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी बसली तर प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमानच असेल, आनंदच होईल…, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मला कायम सुसंस्कृतपणा आणि संयमीपणा दिसला आहे, असंही कोल्हे म्हणाले. संजय राऊत यांनी जो आशावाद व्यक्त केला आहे त्या बद्दल त्यांना शुभेच्छा… मात्र पण सगळ्या विरोधी पक्षांची भूमिका आणि राष्ट्रवादीसह पक्षेश्रष्ठींची भूमिका काय असेल हे माहिती नाही पण ती महत्त्वाची असेल. देशाच्या दृष्टीने आता विरोधकांचा चेहरा कोण हा मुद्दा गौण ठरतो आहे आणि सरकारच्या या एक कलमी कार्यक्रमाला चाप बसवणं गरजेचे आहे. अशा काळात विरोधी पक्षाने एकत्र येणे हे आशादायी चित्र आहे, असंही खासदार कोल्हे म्हणाले.

सरकार संसदेत चर्चेतून पळ काढताना दिसत आहे. संसदेची कार्यवाही चालवणं हे सत्ताधारी पक्षाचं काम आहे. कामकाज सुरू होण्याची नितांत आवश्यकता आहे. पण ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे. चर्चेला जर सत्ताधारी तयार झाले तर अनेक प्रश्नांवर सांगोपांग चर्चा होईल. सरकार जर चर्चेतून पळ काढत असेल तर जनतेचे प्रश्न मांडताना अडचणी येतील, असं ते म्हणाले. पेगसेस, कोविडची तिसरी लाट, प्रचंड वाढलेली महागाई, कृषी कायदे या विषयांवर संसदेत चर्चा झालीच पाहिजे. सरकार म्हणत असेल की हाऊसमध्ये काम रेटून नेऊ पण आमचा याला जोरदार विरोध असेल, असा पवित्राही कोल्हे यांनी घेतला.