उदयनराजेंना साताऱ्यातून उमेदवारी दिली ही मोठी चूक – शरद पवार

0
392

सातारा, दि. १९ (पीसीबी) – एखाद्या माणसाकडून चूक झाली की, त्याने ती चूक कबुल करायची असते. लोकसभेच्या निवडणूकीमध्ये माझ्याकडून  मोठी चूक झाली, ती म्हणजे मी उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून उमेदवारी दिली, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर सभेत सांगितले.

शरद पवार यांनी साताऱ्यात  भर पावसात सभा घेऊन माजी खासदार उद्यनराजे यांच्यावर हल्ला चढवला.  साताऱ्याचा प्रत्येक माणूस ती चूक सुधारण्यासाठी २१ तारखेची वाट बघत आहे, असेही पवार  यावेळी  म्हणाले.

यावेळी पवार भाषणाला उभे राहिले आणि पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र त्या पावसातही शरद पवार यांनी भाजप – सेनेला चांगलेच झोडपून काढले. ते म्हणाले की, वरुणराजानेदेखील आपल्याला आशिर्वाद दिले आहेत. त्याच्या आशिर्वादाने सातारा जिल्ह्यात चमत्कार होणार आहे आणि याची सुरुवात २१ तारखेपासून होणार आहे.

पवार म्हणाले की, देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते, एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात आमचे पैलवान आखाड्यात उतरले आहेत. मात्र समोर कोणी दिसतच नाही, भाजपावाल्यांच्या तोंडी कुस्ती, पैलवान हे शब्द शोभतच नाहीत. राष्ट्रवादीचे पैलवानच निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.