‘चंपा हा शब्द पहिल्यांदा भाजपाच्या मंत्र्याकडून ऐकला’; अजित पवारांचे स्पष्टीकरण

0
445

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख करताना चंपा हा शब्द माझ्यासमोर पहिल्यांदा एका भाजपा कॅबिनेट मंत्र्यानेच वापरल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. मात्र हा नेता कोण आहे याबद्दलची माहिती आपण निवडणुकीनंतर देणार आहोत असेही पवार यांनी सांगितले.

चंपा या शब्दावरुन कोथरुडमधील राजकारण चांगलेच तापले आहे. येथून भाजपाच्या तिकीटवर उभे असलेले राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख विरोधक अनेक सभांमध्ये चंपा असा करत आहेत. चंपा असा उल्लेख सर्वात पहिल्यांदा करणाऱ्या अजित पवार यांनी हा शब्द मी शोधला नसून तो एका भाजपाच्याच कॅबिनेट मंत्र्याच्या तोंडून ऐकल्याचे स्पष्ट केले आहे. ‘आमच्या संघटनेच्या एका सहकाऱ्याबरोबर मी काही कामानिमित्त एका मंत्र्यांकडे गेलो होतो. त्यावेळी त्या सहकाऱ्याने मंत्री मोहद्यांना तुमचे शिफारस पत्र असेल तर काम लवकर होईल, कामात जरा मदत होईल असे सांगितले. त्यावेळी मंत्र्यानी त्या सहकऱ्याला माझे शिफारस पत्राची कितपत मदत होईल ठाऊक नाही. माझे ऐकतील की नाही सांगता येत नाही,’ असे मत व्यक्त केल्याचे अजित पवारांनी सांगितले. ‘हे मंत्रीमोहय पुढे म्हणाले, अरे चंपा माझे ऐकत नाहीत. त्यावेळी मी म्हटले काय. बाहेर आल्यानंतर सहकाऱ्याशी बोलताना मला चंपाचा अर्थ उलगडला चंद्राकांतमधील चे आणि पाटील मधला पा एकत्र करुन त्या भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्याने हा शॉर्टफॉर्म बनवल्याचे माझ्या लक्षात आले,’ असे स्पष्टीकरण अजित पवारांनी पत्रकारांसमोर दिले. ही सर्व घटना तीन-चार महिन्यांपूर्वीची असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये एकदा पत्रकारांबरोबर बोलताना मी हा शब्द वापरला. ‘सध्या राज्यात काम करणारी मंत्र्यांची फळी ही दुसऱ्या पिढीमधील नेत्यांची आहे. यांच्या वडीलांनी वगैरे पवारसाहेबांबरोबर काम केले आहे. त्यामुळे त्यांनी सतत पवारांवर टीका करणे मला पटले नाही आणि बोलता बोलता मी हा शब्द वापरला आणि तो हिट झाला,’ असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे. हडपसर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ प्रचारार्थ रोड शोचे आयोजन केले होते. त्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारांनी राज्यातील अनेक घडामोडी बाबत भूमिका मांडली.