ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये उमेदवारांना प्रवेश नको; जयंत पाटलांचे निवडणूक आयोगाला पत्र   

0
511

मुंबई, दि. ७ (पीसीबी) –  ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये  उमेदवारांना  प्रवेश  देण्यात येवू नये, अशी मागणी  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. याबाबत पाटील यांनी  मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहीले आहे. 

लोकसभेच्या निवडणुका लढविलेल्या उमेदवारांना या सीलबंद मशिन्स व व्हीव्हीपॅट ठेवलेल्या स्ट्राँगरुमध्ये  जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाबाबत आमचा आक्षेप आहे. या निर्णयाचा आम्ही  निषेध करत आहोत,  असेही पाटील यांनी म्हटले आहे.

या निर्णयावर तात्काळ फेरविचार  करुन उमेदवारांना या स्ट्राँगरुममध्ये जाण्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणीही   पाटील यांनी केली आहे.  सीलबंद मशिन्स जवळ उमेदवाराला जाण्याचे काहीही कारण नसते.  ईव्हीएम मशीनमधील डेटामध्ये दुरुस्ती करून मतदान प्रक्रियेत बदल केला जाऊ शकतो, अशी  शंका  जनमानसामध्ये आहे.

याबाबत विरोधी पक्षांनी सबळ पुरावे सादर  केले आहेत, असे पाटील यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाचे उमेदवार  तांत्रिक फेरफार करून  ईव्हीएममध्ये नोंदवलेल्या  निकालामध्ये  बदल  करण्याची शक्यता आहे, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली आहे.