ईव्हीएम घोटाळ्याची माहिती असल्याने गोपीनाथ मुंडेंची हत्या; सय्यद शुजाचा खळबळजनक दावा

0
2565

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना   ईव्हीएम घोटाळ्याची माहिती  होती, म्हणून त्यांची हत्या झाली, असा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टने लाइव्ह  पत्रकार परिषदेत  केला आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या, असा आरोपही त्याने केला आहे.  आपल्याकडे हॅकिंग कसे झाले, याचे पुरावे असून ते  सादर करण्याचा दावाही त्याने केला आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू नवी दिल्लीमध्ये कार अपघातात झाला होता. मात्र, शुजा या सायबर एक्सपर्टच्या दाव्यामुळे  या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

लंडनमध्ये  घेतलेल्या पत्रकार परिषदेत शुजा म्हणाले की,  दिल्लीमधील २०१५  च्या  निवडणुकांतही घोळ होणार होता,  मात्र, आम्ही वेळीच हस्तक्षेप केला.  आपने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या अन्यथा भाजपाने निवडणुका जिंकल्या असत्या, असे शुजाने  म्हटले आहे.  ईव्हीएम डिझाईन केलेल्या टीममध्ये आपण होतो, असे सांगून ही मशिन कशी हॅक करता येतील, हे आपण दाखवू शकतो, असेही त्याने म्हटले आहे.

शुजा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि. या कंपनीमध्ये २००९ ते २०१४ या कालावधीत  नोकरीला  होता.  दरम्यान,  शुजावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता, त्यामुळे तो गुप्त ठिकाणावरून व्हिडीयो कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्कात आहे.  याआधीही सय्यद शुजा व त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ले झाले आहेत.