“ईडी विषय आता नेहमीचा झालाय. त्याला घाबरण्याचं कारण नाही”

0
258

मुंबई, दि.२० (पीसीबी) : नांदेडमधील बड्या नेत्यावर ईडीची कारवाई होण्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. पाटील यांचा रोख काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांनीही पाटील यांना प्रत्युत्तर दिलं. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाटील यांच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिलीय. जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी हा प्रकार केला जातोय. ईडी विषय आता नेहमीचा झालाय. त्याला घाबरण्याचं कारण नाही, असं नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस याला घाबरणार नाही. आम्ही जनतेच्या प्रश्नावर केंद्र सरकारविरोधात लढत राहणार. स्वीस बँकेत काळा पैसा वाढला आहे. हे पैसे भाजपच्या लोकांचे आहेत का? सगळे चोर आणि हे साव अशी भूमिका भाजपवाले घेत आहेत. पण लोक आता त्याला हसत आहेत. अमित शाह यांच्या मुलाचे उत्पन्न एका वर्षात 9 हजार पटीने वाढले असेल तर मोदींच्या बाजूला बसणाऱ्या अमित शाह यांनाच भीती वाटायला हवी, असा टोला पटोले यांनी लगावलाय.

दुसरीकडे प्रदेश काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपद अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर सचिन सावंत नाराज असून त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलाय. तसंच हायकमांडला आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी त्यांनी केल्याचं कळतंय. याबाबत बोलताना सचिन सावंत यांचं पत्र मला आलेलं नाही. याबाबत त्यांच्याबरोबर चर्चा करु. त्यांची नाराजी असली तर बसून ती दूर करण्याचा प्रयत्न करु, असं पटोले म्हणाले.

तर शाहरुख खानचा मुलगा असो वा अमित शाहांचा हा प्रश्न गौण आहे. मागील 7 वर्षात देश 50 वर्षे मागे गेलाय. आज देश धोक्यात आले. चीनचे आक्रमण होत असताना त्याबाबत कोणतंही भाष्य सरकार करत नाही. त्यामुळे हे सरकार चीनचे दलाल आहेत का? असा खोचक सवाल पटोले यांनी केलाय.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पाटलांचं वक्तव्य म्हणजे निवडणूक पाहून खळबळ माजवण्याचा प्रयत्न आहे. चंद्रकांत पाटील यांना इतकी माहिती मिळते कुठून? असा सवाल करत लोकशाहीत असे अपेक्षित नसल्याचं चव्हाण म्हणाले.

नांदेडमधील बड्या नेत्यांवर ईडीची किंवा आयकरची कारवाई होणार आहे का? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाटील यांना केला होता. हा सवाल येताच चंद्रकांतदादा आधी हसले. त्यानंतर त्यांनी पॉझ घेतला आणि आपल्या स्टाईलने उत्तर दिलं. मी काही तपास यंत्रणांचा अधिकारी नाही. त्यामुळे मला माहीत नाही. पण माझ्या हसण्यावरून काही कळलं तर ते कॅरी करायला हरकत नाही, असं सूचक विधान चंद्रकांतदादांनी केलं.