आळंदीत बाहेरील जोडप्यांना विवाहास बंदी आळंदीतील अर्थकारणावरही परिणाम

0
684

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) : हक्काचे ठिकाण असलेल्या तीर्थक्षेत्र आळंदीत यापुढे बाहेरील जोडप्यांना विवाह करता येणार नाही. वधू किंवा वर आळंदीनिवासी असल्याशिवाय लग्नासाठी परवानगी दिली जाणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय झाल्याने एकीकडे त्याचे स्वागत होत असतानाच, विवाह विधीशी संबंधित आळंदीचे ७५ टक्के अर्थकारण अवलंबून असल्याने त्याचा फटकाही अनेक घटकांना बसणार असल्याचे स्पष्ट दिसते आहे. कोट्यवधी रुपयेंचा व्यवसाय बुडणार असल्याने नाराजीचा सूर आहे.

तिर्थक्षेत्र तसेच सर्व सुविधा असल्याने पुणे, पिंपरी चिंचवडसह शेजारच्या नगर, नाशिक जिल्ह्यातूनसुध्दा खास विवाहासाठी लोक आळंदी निवडतात. कमी खर्चात अत्यंत साध्या पध्दतीने परंपरा जतन करून तसेच चोरीछुपे होणारे आंतरजातीय अथवा नोंदणी पध्दतीचे विवाहासाठीसुध्दा आळंदीत होतात. या परिसरात सुमारे पाचशेहून अधिक मंगल कार्यालये तथा धर्मशाळा असून तेथे लग्नसराईत ७०० ते हजार लग्न होतात. अगदी ५०, १००, २००, ५०० नागरिकांच्या जेवणासह पॅकेज पध्दतीने विवाह लावण्याची सोय असल्याने लोकांची पसंती आळंदीला असते. टाळेबंदी लागू झाल्यापासून विवाह सोहळ्यांना बंदी घालण्यात आली. यापुढे घरात केवळ ५० जणांच्या उपस्थितीत आणि वधू किंवा वर आळंदीतील असल्याशिवाय या ठिकाणी विवाह करता येणार नसल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.

लग्नसराईत केटर्स, वाढपी, आचारी, मंडपवाले, पुरोहित, वाजंत्री, कासार, फुलवाले असे जवळपास १२ ते १५ हजार जण अवलंबून आहेत. टाळेबंदीत त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. आता नव्या निर्णयाने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. शासनाने लक्ष देऊन योग्य तोडगा काढण्याची मागणी या घटकांकडून होत आहे.

“आळंदीत होणाऱ्या लग्नसोहळ्यांसाठी मोठय़ा संख्येने नागरिक दाखल होतात. बाहेरील नागरिकांमुळे आळंदीत करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून फक्त आळंदीतील स्थानिक नागरिकांना घरात ५० जणांच्या उपस्थितीत परवानगी देता येईल. मात्र, बाहेरील नागरिकांना आळंदीत लग्न करता येणार नाही.“
– संजय तेली, उपविभागीय अधिकारी, खेड