खासगी रुग्णालयातील `त्या` डॅाक्टर्स, नर्सेसवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

0
283

ठाणे, दि. २८ (पीसीबी) : ठाणे शहरात कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने काही खासगी रुग्णालये अधिगृहित केली आहेत. या रुग्णालयांतील डॅाक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी त्या-त्या रुग्णालयांमध्ये कामावर उपस्थित न राहिल्याने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. महापालिकेच्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ठाणे शहरात कोरोनाचा सामना करता यावा आणि रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने अनेक खासगी रुग्णालये त्यामध्ये काम करणाऱ्या डॅाक्टर्स आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांसह अधिगृहित करण्यात आली आहेत. महापालिका प्रशासनाने यापूर्वी तसे आदेशही दिले आहेत. तरीही कौशल्या हॅास्पिटल, होरायझन प्राईम आणि ठाणे हेल्थ केअर सेंटर या रुग्णालयातील डॅाक्टर्स आणि इतर कर्मचारी हे सेवेत हजर झालेले नाही. ही बाब लक्षात घेवून या तीनही हॅास्पिटलमधील सेवेत हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहित कलम 188 मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.