आरेतील वृक्षतोड थांबवा; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

0
468

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – पुढील सुनावणी होईपर्यंत मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या आरेतील वृक्षतोड थांबविण्यात यावी, असा आदेश  आज ( सोमवारी) सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पर्यावरण वाद्यांना  मोठा  दिलासा मिळाला आहे. 

ग्रेटर नोएडातील विद्यार्थ्याने लिहिलेल्या पत्राची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने स्यु मोटू याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने वृक्षतोडीला स्थगिती देण्याबरोबरच अटक केलेल्या आंदोलकांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यास मनाई नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्यानंतर त्याच रात्रीपासून आरेमध्ये वृक्षतोड करण्यात आली. मात्र, सरकारकडून करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांसह विद्यार्थ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वृक्षतोडीला परवानगी दिल्यानंतर ग्रेटर नोएडा येथील विधि शाखेचा विद्यार्थी रीशव रंजन याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना आरेतील वृक्षतोडीबाबत पत्र पाठवले होते.