आमदार शिवेंद्रराजे- खासदार उदयनराजे यांचे मनोमिलन; शरद पवारांची मध्यस्थी यशस्वी   

0
826

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. या पार्श्वभूमीवर    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली.  याबैठकीत साताऱ्याचे आमदार  शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मिटवून त्यांचे मनोमिलन करण्यात पवारांना यश आल्याचे समजते.  पवार यांनी मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटवला आहे. तसेच एकदिलाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून  उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे नेते लोकसभा निवडणुकीत आपले काम करण्याच्या मनःस्थितीत नाहीत, त्यामुळे  उदयनराजे यांनी भाजपच्या  तिकीटावर निवडणूक लढवावी, असा आग्रह उदयनराजेंचे समर्थक करत होते. मात्र, पवारांनी दोन राजेंना बोलावून त्यांच्यातील वाद मिटवला आहे.

एकदिलाने निवडणूक लढण्यास उदयनराजे आणि शिवेंद्रराजे तयार झाले आहेत.  उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करावे आणि विधानसभा निवडणुकीतही मदत करावी, अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली. तर उद्यनराजे यांनीही एकदिलाने निवडणुकीत काम करणार असल्याचे सांगितले. यामुळे पक्षांतर्गत धुसफूस कमी करण्यात पवारांना यश आल्याचे सांगितले जात आहे.