राष्ट्रवादीकडून मावळमध्ये पार्थ पवारांची उमेदवारी निश्चित  

0
953

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  राष्ट्रवादीच्या  स्थानिक नेत्यांनी पार्थ यांनाच उमेदवारी देण्‌याची मागणी लावून धरली होती. अखेर पार्थ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत  झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत पार्थ यांच्या उमेदवारीवर शरद पवार यांनी हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांनी दिली .

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मवाळ लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवाराचा शोध सुरू होता.  त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी केली होती. पा्र्थ पवार यांनीही गेल्या अनेक दिवसांपासून मावळ मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर जोर दिला होता. विविध कार्यक्रमाना ते हजेरी लावत होते. पिंपरी-चिंचवड मध्ये पक्षाच्या फ्लेक्सवर त्यांची छबी दिसू लागली होती.  त्यांच्या उपस्थितीचे फलक शहर आणि परिसरात झळकू लागले होते.

दरम्यान, मवाळ  मतदारसंघात राष्ट्रवादीकडे  तुल्यबळ स्थानिक उमेदवार नाही.  या मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडसह  मावळात अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत.  पार्थ यांना उमेदवारी दिल्यास पक्षातील गटबाजीला लगाम बसेल, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे  पार्थ  यांना उमेदवारी देण्याची मागणी होत होती.

तर, दुसरीकडे एकाच कुटुंबातील किती जणांना उमेदवारी द्यायची?, असा मुद्दा उपस्थित करून  पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांच्या उमेदवारीची शक्यता फेटाळून लावली होती.  मात्र,  पवारांच्या या भूमिकेनंतरही कार्यकर्त्यांकडून पार्थ यांच्याच उमेदवारीचा आग्रह धरला होता. अखेर पार्थ यांची उमेदवारी निश्चित केल्याचे सूत्रांकडून समजते.