आमदार लक्ष्मण जगताप आयसीयू मधून बाहेर आले..

0
549

– प्रकृतीत लक्षणीय सुधारणा, लवकरच घरी सोडणार

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये १२ एप्रिल पासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज त्यांना अतिदक्षता विभागातून (आयसीयू) बाहेर स्वतंत्र रुममध्ये हलविण्यात आले आहे.
दोन वर्षांपासून आमदार जगताप यांची प्रकृती काहिशी ठिक नाही. मध्यंतरी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेण्यात आले होते. दीड महिन्यांपूर्वी ते पुन्हा देशात परतले. एक दिवस त्यांना अस्वस्थ वाटू लागले म्हणून बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. प्रकृती चिंताजनक होती, पण त्यानंतर अमेरिकेतून महत्वाची इंजेक्शन मागविण्यात आली. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले. पवार, फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रियमंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, यांच्यासह अनेकांनी प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाऊन आमदार जगताप यांच्या नातेवाईकांकडे विचारपूस केली होती. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार जगताप यांच्या तब्बेतीसाठी अनेक मंदिरांतून अभिषेक, महापूजा केल्या.

पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक पडला. आमदार जगताप यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. आपल्या समर्थकांसाठी त्यांनी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातून खिडकीत येत हात हालवत हास्यमुद्रेने प्रतिसाद दिला. आज त्यांना अतिदक्षता विभागातून स्वतंत्र रुममध्ये स्थलांतरीत कऱण्यात आले. लवकरच त्यांना घरी सोडणार असल्याचे सांगण्यात आले.