आमदार महेश लांडगे समर्थकांमुळे आमदार लक्ष्मण जगताप यांना मोठा फटका..

0
765

– पिंपळे गुरवच्या दोन्ही प्रभागांत एससी, एसटी आरक्षणामुळे खुल्या जागेसाठी प्रचंड चुरस होणार

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेत २०२२ मध्ये पुन्हा सत्तेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान लढाई सुरू आहे. अशातच प्रभाग रचनेत झालेल्या फेरबदलातून आरक्षणावर झालेल्या परिणामामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बालेकिल्ल्यालाच सुरूंग लागला आहे. चऱ्होली प्रभागात अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणावरून आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती घेतल्या होत्या. त्या अनुशंगाने प्रभाग रचनेत काही अंशी फेरबदल झाल्याने चऱ्होलीतील एसटीचे आरक्षण पिंपळे गुरवला लागू झाले. आमदार लांडगे यांच्या हरकतींचा सर्वात मोठा फटका आमदार जगताप यांना बसल्याने आता आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांची कोंडी झाली आहे.

२०१७ मध्ये भाजपाचे दमदार आमदार लक्ष्मण जगताप यांची व्युहरचना, जिद्द आणि चिकाटीमुळे अजित पवार यांची सलग २० वर्षांची एकहाती सत्ता गेली. पिंपळे गुरव परिसरात आमदारांच्या घरात भाजपाची अडचण होणार आहे. प्रभाग रचनेनुसार पिंपळे गुरवचा प्रभाग ४१ आणि ४४ मध्ये प्रत्येकी तीन जागांपैकी एक अनुसूचित जाती (एससी) आणि दुसरी अनुसूचित जमाती (एसटी) साठी राखीव झाल्याने फक्त एक-एक जागा खुली असणार आहे. आमदार जगताप यांचे धाकटे बंधू माजी नगरसवेक शंकर जगताप यांच्यासह अनेक समर्थक रथी महारथी इच्छुक असून त्यांची मोठी कोंडी होणार आहे. आता शेजारील प्रभाग क्रमांक ४५ मध्ये तीनही जागा खुल्या असल्याने काही इच्छुकांनी तिकडे मोर्चा वळविला आहे.

प्रभाग क्रमांक ४१ म्हणजे पिंपळे गुरव गावठाण, जवळकरनगर, सुदर्शननगर परिसराचा समावेश होतो. या प्रभागात एकूण लोकसंख्या ३४ हजार ७१ असून त्यात एससी ची ५,६५३ आणि एसटी ची २,३३३ लोकसंख्या आहे. या प्रभागातून अवघ्या एका जागेसाठी ज्यांची नावे चर्चेत आहेत त्यात प्रामुख्याने माजी नगरसवेक शंकर जगताप, राहुल जवळकर तसेच शाम जगताप, तानाजी जवळकर, अरुण पवार, माजी नगरसवेक राजू रामा लोखंडे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप हे प्रबळ दावेदार आहेत. जर ही जागा खुल्या गटातील महिलांसाठी राखीव झाली तर तृप्ती जवळकर, आश्विनी शाम जगताप, माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे यांची नावे चर्चेत आहेत.
आमदारांच्या या प्रभागात एसटी (महिला) मध्ये माजी महापौर शकुंतला धराडे, माजी नगरसेविका उषा मुंडे, सारिका पवार, मीरा शेळके तर, एसटी (पुरुष) असल्यास विष्णू शेळके, एडव्होकेट सुदाम मराडे, मुकेश पवार यांची नावे स्पर्धेत असतील. एससी गटातून माजी नगरसेविका शोभा आदियाल, किरण शशिकांत दुधारे, शंतणू (पप्पू) डोळस, रोहित जाधव यांची नावे चर्चेत आहेत.

आमदार जगताप यांचा प्रभाव असलेला दुसरा प्रभाग क्रमांक
४४ मध्ये पिंपळे गुरव, राजीव गांधीनगर, गजानन नगर, भिमाशंकर कॉलनी, गंगोत्री नगर, विद्यानगर हा परिसर आहे. या प्रभागाची लोकसंख्या ४०,०३२ असून त्यात एससी ७,०११ आणि एसटी २,०१८ अशी लोकसंख्या आहे. या प्रभागातसुध्दा खुल्या जागेसाठी माजी नगरसवेक शंकर जगताप यांचेही नाव चर्चेत आहे. त्यांच्याशिवाय आमदार जगताप यांचे कट्टर विरोधक माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचे नाव प्रबळ दावेदारांमध्ये घेतले जाते. त्यांच्याशिवाय आमदारांचे समर्थक माजी नगरसवेक शशिकांत कदम, ड प्रभागाचे स्विकृत सदस्य महेश जगताप, संतोष उर्फ पप्पू सखाराम देवकर, संदेशकुमार नवले, ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप अशी नावे प्रबळ दावेदार म्हणून घेतली जातात. खुल्या गटात महिला आरक्षण पडल्यास सुषमा शशिकांत कदम, तृप्ती संतोष देवकर, पल्लवी महेश जगताप, कावेरी संजय जगताप, शोभा नवनाथ जांभुळकर यांची नावे स्पर्धेत असू शकतात.
प्रभागातील एसटी राखीव जागेसाठीही माजी महापौर शकुंतला धराडे यांचे प्रमुख नाव घेतले जाते. त्यांच्याशिवाय डॉ. संतोष सुपे, एडव्होकेट सुदाम मराडे ही नावे स्पर्धेत असल्याची चर्चा आहे.
एससी राखीव मध्ये माजी नगरसेवक सागर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, रविनी सागर आंगोळकर, अभय नरडावेकर
, भागवत शिंदे, अनिल कांबळे, सुरेश सकट, कैलास बनसोडे, दिलीप कांबळे, अमित सुवासे, बाळासाहेब सोनवणे अशी तब्बल ११ नावांची चर्चा आहे.
प्रभाग ४५ मध्ये रथी महारथी समोरासमोर येणार –
पिंपळे गुरवला दोन प्रभागांत सर्वसाधारण खुल्या जागेसाठी मोठी चढाओढ असल्याने शेजारील प्रभाग क्रमांक ४५ वर अनेकांच्या नजरा आहेत. या प्रभागात नवी सांगवी, पिंपळे गुरवचा काही भाग आहे. इथे तीनही जागा खुल्या असल्याने आमदार समर्थक समोरासमोर ठाकणार आहेत. या तिसऱ्या प्रभागात खुल्या पुरुष गटामधूनसुध्दा आमदार जगताप यांचे धाकटे बंधू शंकर यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्याशिवाय स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे तसेच रावसाहेब चौगुले, मारुतराव साळुंखे, सागर परदेशी, अमित पसरणीकर, सखाराम रेडेकर, गणेश बनकर, प्रशांत सपकाळ, गौरव टण्णू, राजेंद्र पाटील, दीपक ढोरे, निलेश गांगार्डे, श्रीनिवास बढे ही नावे चर्चेत आहेत.

महिला राखीव मधून जी नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत त्यात
माजी नगरसेविका माधवी राजेंद्र राजापुरे, सिमा रावसाहेब चौगुले, सुरेखा मारुतराव साळुंखे तसेच सावित्री किशोर गारवे, उमा शिवाजी पाडुळे, भक्ती गौरव टण्णू, भारती राजेंद्र पाटील, पूर्वा पवन साळुंखे, पूर्वा अमित निंबाळकर, उर्मिला बाळासाहेब देवकर यांचा समावेश आहे.
आमदार जगताप यांनी ३० वर्षे शहरात यशस्वी राजकारण केले. २०१७ पासून भाजपाच्या माध्यमातून महापालिकेत त्यांची सत्ता आली. गेले दीड महिना ते रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांचे समर्थक उमेदवार चिंतेत आहेत. अनेकांनी आपले पुढचे भविष्य ओळखून भाजपाला रामराम केला आणि राष्ट्रवादी बरोबर हातमिळणी केली. भाजपाचे अर्धे अधिक माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामिल झाले आहेत. महापालिकेत पुन्हा भाजपाची सत्ते येणे कठिण दिसत असल्याने असंख्य माजी नगरसवेकांनी भाजपा सोडून अन्य पर्याय चोखाळायला आरंभ केला. काही तगडी नावे शिवसेना, मनसे किंवा थेट आप च्या सुध्दा संपर्कात आहेत, असे समजले. २०१७ मध्ये केंद्रात, राज्यात भाजपाचीच सत्ता होती म्हणून महापालिकेत भाजपाची सत्ता आली. आता महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीचे सरकार असल्याने पुन्हा महापालिकेत सत्ता घेणे भाजपासाठी अग्निपरिक्षा असणार आहे. आमदार जगताप यांना त्यांची प्रकृति साथ देत नसल्याने त्यांच्या समर्थकांना समोर कोणी वाली दिसत नाही. अशा परिस्थितीत किमान चिंचवड विधानसभा मतदारसंघातील चित्र अत्यंत धूसर होत चालले आहे.