आनंद दिघेंच्या मृत्युला बाळासाहेब ठाकरे जबाबदार;निलेश राणेंचा खळबळजनक आरोप

0
1354

सिंधुदुर्ग , दि. १४ (पीसीबी) –  आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणी  दिवंगत शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे  जबाबदार  असल्याचा सनसनाटी आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते व माजी खासदार  निलेश राणे यांनी केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीतील वाटद जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्यात नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.  या आरोपांना एका मुलाखतीत  निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. नारायण राणे यांनी बाळासाहेबांबद्दल  बोलताना मर्यादा पाळली.  मात्र,  माझ्या वडिलांवर भर सभेत गलिच्छ आरोप होत असतील तर मला बाळासाहेबांबद्दल बोलावे लागेल, असे म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेवर  हल्ला चढवला.

आनंद दिघेंच्या हत्येचा कट कसा रचला गेला?  बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन शिवसैनिकांनी तसे प्रयत्नही केले. ठाकरे घराण्याचे आणि सोनू निगमचे काय नातं होतं? हे मला सांगायला लावू नका असा इशाराही निलेश राणेंनी दिला. बाळासाहेब ठाकरेंच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर कोणाकोणाचे मृत्यू झाले. हे सगळे जाहीर सभेत सांगेन, तसे करायला भाग पाडू नका, असा इशारा निलेश राणे यांनी  यावेळी दिला. निलेश यांच्या आरोपावर शिवसेना कोणती प्रतिक्रिया देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.