आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होणार का? मुख्यमंत्री म्हणतात…

0
650

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री बनवायचे की नाही हा निर्णय त्यांच्या पक्षाला घ्यायचा आहे. त्यांच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेत नाही. मागच्या मंत्रिमंडळ विस्तारा वेळीही आम्ही त्यांना उपमुख्यमंत्रीसाठी तयारी दर्शवली होती.  आता  उपमुख्यमंत्री कोणाला करायचे  याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांच्या संवाद दौऱ्याचे कौतुक केले .  आदित्य ठाकरे यांच्या यात्रेचा मला आनंद आहे. शिवसेनेचे भावी नेते ते आहेत. आदित्य निवडणूक लढवणार असतील,  तर त्यांनी लढवली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले .

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर  मुख्यमंत्रीपद कुणाला देणार? यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मी पुन्हा येणार हे मी आधीच सांगितले आहे.  तसेच अडीच अडीच वर्षाचे काही समीकरण आहे का? याचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, असे काहीच नाही. नेमके सत्तेविषयी काय करायचे याविषयी आमची चर्चा झालेली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मी मिळून सर्व काही ठरवले आहे. योग्य वेळी आम्ही ते जाहीर करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.