‘आता जोपर्यंत हक्काची घरे मिळत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही’; ‘त्या’ पोलिस कुटुंबीयांचा संयम संपला

0
248

मुंबई, दि.२८ (पीसीबी) : मुंबई शहराची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना घराबाबत फक्त आश्वासनांची भेळ मिळत आहे. त्यांना अद्यापही हक्काची घरे मिळालेली नाहीत. त्याचबरोबर बीडीडी चाळीचा पुनर्विकासाचा प्रश्नही अजूनही आहेच. सर्व पक्षीय नेते निवडणुकीच्या वेळी फक्त आश्वासने देऊन निघून जातात. मात्र, आता जोपर्यंत हक्काची घरे मिळत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही, असा पवित्राच बीडीडी चाळीत वास्तव्यास असलेल्या पोलीस कुटुंबांनी घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या निर्णयाचं मनसेकडूनही स्वागत केलं आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी पोलीस परिवारांची भेट घेऊन त्यांना मनसेचा लेखी पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे.

पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळावी या मुद्द्यावरुनआज (27 जून) बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व पोलीसपुत्रांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. सर्वांनी एकत्र येऊन कोणत्याही पक्षासाठी न लढता फक्त आपल्या हक्काच्या घरासाठी लढूया, असा निर्धार एकमताने झाला. जोपर्यंत बीडीडी चाळीतील घरं पोलिसांच्या नावांवर होत नाहीत तोवर हक्काच्या घरांसाठी सुरू असलेला पोलीस परिवारांचा लढा सुरूच राहील, अशी भूमिका सर्वांनी घेतली. “पोलिसांच्या हक्काच्या घरासाठी सुरू असलेला लढा यापुढेही सुरूच राहणार. पोलीस कुटुंबांच्या जोरावर अनेक राजकीय पक्ष मोठे झाले. अनेकांनी आपापल्या पोळ्या भाजल्या. पण आता एकाही राजकीय पक्षाला पोलीस परिवार मतांची भीक घालणार नाही. पुरे झालीत तुमची तोंडी आश्वासनं. आता हवाय लेखी पाठिंबा”, अशा शब्दात पोलीस परिवारातल्या तरूणांनी राजकीय पक्षांना ठणकावलं. त्यानंतर मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी पोलीस परिवाराची भेट घेऊन त्यांचा लेखी पाठिंबा जाहीर केला.

मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी आश्वासन दिले आहे कि, “मनसे प्रमुख राज ठाकरे नेहमीच पोलिसांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. आझाद मैदान दंगलीच्या प्रसंगी पोलिसांवर झालेला हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढणारा मनसे हा एकमेव राजकीय पक्ष होता. त्यामुळे पोलीसांच्या घराच्या लढ्यातही मनसे उतरणार.”

“पोलीस परिवाराच्या आजच्या बैठकीमुळे स्थानिक पातळीवरील राजकरण चांगलंच तापलेलं बघायला मिळालं. पण सर्व पोलीस परिवार एकत्र आले तर काहीही करू शकतात. हेच राज्य सरकारला दाखवून देण्याची वेळ आता जवळ आलीय. आपण आजवर अनेक पक्षांचे झेंडे हाती घेतलेत. पण आता कुणाचाच झेंडा हाती नको. जो आपल्यासाठी लढणार तोच आपला. आताची लढाई ही पोलीस पुत्रांची लढाई आहे. पोलीस परिवाराची लढाई आहे. ही लढाई पोलीस परिवारच जिंकणार. कारण आता ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाची नाही तर पोलीस कुटुंबाची आहे. जोपर्यंत ही घरं नावावर होत नाहीत तोर्पंत ही लढाई अशीच सुरू राहणार”, अशी भूमिका पोलीस परिवारांनी बैठकीत मांडली.