शरद पवार आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर होऊ शकते चर्चा

0
411

मुंबई, दि.१६ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 4 वाजता दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार असून या भेटीत ते राजनाथ सिंह यांच्याशी संरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. त्यामुळे पवार-राजनाथ सिंह यांच्या भेटीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या भेटीत संरक्षण विषयक मुद्द्यांवर चर्चा होणार असून अधिवेशनाच्या तोंडावर भाजपकडून विरोधकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पवार-राजनाथ सिंह यांच्या आजच्या भेटीकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. या भेटीत इतर राजकीय विषयावरही चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नागपूरमध्ये मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा अधिवेशनात सरकारला संरक्षणाच्या मुद्द्यावरून धारेवर धरणार असल्याचा इशारा दिला होता. दिल्लीतील पावसाळी अधिवेशनात महागाई, शेतकऱ्यांचा प्रश्न, कोरोना, चीनच्या सीमेवर काय चाललंय या मुद्द्यांवर चर्चा होणार, असल्याचंही त्यांनी सांगितलं. संसंदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार आहे. तर, मान्सून सत्राचा समारोप 13 ऑगस्टला होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशनात 20 दिवस कामकाज चालण्याची शक्यता आहे. तर, स्वातंत्र्यदिनापूर्वी संसदेचं पावसाळी अधिवेशन समाप्त होईल. पावसाळी अधिवेशनात कोरोना नियमांचं पालन केलं जाणार आहे. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ज्यांनी कोरोना लस घेतली नाही ते खासदार कोरोना लसीचा पहिला डोस घेतील अशी शक्यता आहे.