आजपासून प्लास्टिक बंदी, ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड; उल्लंघन केल्यास तीन महिन्यांपर्यंत कैद

0
441

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – राज्य सरकारने पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिक, थर्माकोल व प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोझेबल वस्तू, त्यांचे उत्पादन आणि वापरावर राज्यात लागू केलेल्या बंदीची शनिवारपासून (२३ जून) अंमलबजावणी होत आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ५ ते २५ हजारांपर्यंत दंड किंवा तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.

बंदीच्या निर्णयाबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन रामदास कदम यांनी केले. ते म्हणाले, ‘येत्या आठ दिवसांत प्लास्टिक बंदीसदंर्भात राज्यभर मोठी जनजागृती मोहीम विभाग हाती घेत आहे. त्यामुळे सर्व संभ्रम दूर होतील. बंदी मोडणाऱ्यांना दंडाची शिक्षा कमी करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही, असेही कदम यांनी निक्षूण सांगितले.