‘आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांच्या निवडणूकीच्या तयारीला लागा’ – श्रीरंग बारणे

0
259

– महाविकास आघाडीच्या माध्यमातून मावळ तालुक्यात सर्वाधिक विकासकामे

तळेगाव दाभाडे, दि. २१ (पीसीबी) – महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सर्वाधिक विकासकामे मावळ तालुक्यातील मार्गी लागली आहेत. सरकारने केलेली जनविकासाची कामे शिवसैनिकांनी मतदारांपर्यंत पोहोचवावी. मावळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांच्या निवडणुका शिवसेना संपूर्ण ताकतीने लढविणार आहे. शिवसैनिकांनी निवडणुकीची तयारी सुरु करावी. प्रत्येक वॉर्डमध्ये,गावात शिवसेनेची बांधणी करावी, गटप्रमुख ते उपतालुका प्रमुख यांनी सतर्क राहून पक्ष संघटना मजबूत करावी, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांच्या निवडणुका जवळ आल्या असून त्या पार्श्वभूमीवर मावळ विधानसभा शिवसेना पक्षाची विभागीय बैठक खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली सोमाटणे फाटा येथे आज (शनिवारी) पार पडली. यावेळी निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, कार्यकर्त्यांची मते खासदार बारणे यांनी जाणून घेतली. निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. शासकीय समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झालेल्यांचे अभिनंदन करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, महिला जिल्हा संघटिका शैला खंडागळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, अनिकेत घुले, श्याम सुतार, उपतालुका प्रमुख चंद्रकांत भोते, अमित कुंभार, आशिष ठोंबरे, मदन शेंडगे, महिला आघाडी तालुका संघटिका अनिता गोंटे तसेच सर्व प्रमुक पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, विद्यार्थी सेना पदाधिकारी उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे जिल्हा आणि खासकरुन मावळ तालुक्यातील विकासाला चालना दिली. सरकारने केलेली जनविकासाची कामे मतदारांपर्यंत पोहोचवावीत. प्रलंबित कामे मार्गी लावण्याबरोबरच झालेल्या कामांची माहिती खासदार बारणे यांनी दिली. त्याचबरोबर मराठा आरक्षणाला सर्वोतोपरी पाठिंबा शिवसेनेचा राहिला आहे. बैलगाडा शर्यतीबाबत आपण लोकसभेत प्रश्न विचारुन बैलगाडा शर्यत चालू करण्याची मागणी केली होती. राज्य सरकार देखील बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पीएमआरडीएच्या प्रसिद्ध झालेल्या आराखड्यावर काय हरकती असतील. त्या मुदतीत घ्याव्यात. रिंगरोडबाबतच्या तक्रारीही कराव्यात. त्याबाबतच्या हरकती, सूचनांचा पाठपुरावा करावा.

खासदार बारणे म्हणाले, मावळ तालुक्यातील लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव, देहूगाव नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना संपूर्ण ताकतीने लढविणार आहे. महाविकास आघाडीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. पण, वेळ पडल्यास पदाधिकारी, शिवसैनिकांनी तयारी चालू ठेवावी. प्रत्येक वॉर्डामध्ये,गावात शिवसेनेची बांधणी करावी. गटप्रमुख ते उपतालुका प्रमुख यांनी सतर्क रहावे. शिवसेनेच्या कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावावी. लोणावळा, तळेगाव नगरपरिषदच्या हद्दीतील पदाधिकारी यांनी विभागवार नियोजन करावे. मराठा आरक्षणबाबत लोकांमध्ये जाऊन शिवसेनेची भूमिका समजावून सांगावी. शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त लोकांमध्ये जाऊन काम करावे अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी केल्या. तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांनी प्रस्ताविक केले. तर, विभागप्रमुख राम सावंत यांनी आभार मानले.