आकुर्डीतील सराफी दुकानातून पावणेतीन लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

0
395

आकुर्डी, दि. ५ (पीसीबी) – कारमधून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी सराफी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. तसेच दुकानातील २ लाख ७८ हजार ५४० लाखांचे चांदीचे दागिने चोरुन नेले. ही घटना शनिवारी (दि.४) रात्री पावणेदोनच्या सुमारास आकुर्डीतील अंबिका ज्वेलर्स या दुकानात घडली.

याप्रकरणी दुकानाचे मालक अभिषेक रमेश सोलंकी (वय ३४, रा. सोनिगरा क्लासिक, विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक यांचे आकुर्डीतील विठ्‌ठलवाडी येथे अंबिका ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. शनिवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास त्यांचे दुकान कुलुप लावून बंद असताना (एमएच/१२/जेयू/९३८०) या क्रमांकाच्या तवेरा कारमधून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने दुकानाचे शटर उचकटले. तसेच दुकानातील काउंटरच्या ड्रॉवर आणि रॅकमध्ये ठेवलेले एकूण २ लाख ७८ हजारांचे चांदीचे दागिने चोरुन नेले. सहायक पोलीस निरीक्षक एल.एम सोनवणे तपास करत आहेत.