आई-वडिलांना घरातून हाकलून देणाऱ्या मुलगा आणि सुनेवर गुन्हा दाखल

0
267

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – कौटुंबिक कारणांवरून आई-वडिलांसोबत भांडण करून मुलगा आणि सुनेने त्यांना घराबाहेर काढले. काही दिवस लहान मुलाकडे राहून आई-वडील घरी आले असता मुलगा आणि सुनेने त्यांना घरात येण्यास मज्जाव केला. याबाबत मुलगा आणि सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना राव कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.

प्रदीप जनार्दन शिंदे, कविता प्रदीप शिंदे (दोघे रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल झालेल्या मुलगा आणि सुनेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी प्रदीपचे वडील जनार्दन दत्तात्रय शिंदे (वय 68) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे त्यांचा मोठा मुलगा प्रदीप याच्यासोबत घरगुती कारणांवरून भांडण झाले. त्यावेळी प्रदीपची पत्नी आरोपी कविता हिने फिर्यादी यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. 2018 साली आरोपींनी फिर्यादी यांना घरातून हाकलून देण्याची धमकी देऊन घराला कुलूप लावले.

तसेच ‘तुम्ही या घरात पुन्हा यायचे नाही’ असे म्हणून त्यांना घरातून हाकलून दिले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांची पत्नी लहान मुलाकडे राहण्यासाठी गेले. दोन वर्ष लहान मुलाकडे राहिल्यानंतर फिर्यादी आणि त्यांची पत्नी पुन्हा आपल्या घराकडे परत आले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या घराच्या वाटेवर पत्रे मारून रस्ता बंद केला.

याबाबत फिर्यादी यांनी आरोपी मुलगा आणि सुनेकडे विचारणा केली असता त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी करून धक्काबुक्की करत हाकलून लावले. याबाबत मुलगा आणि सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
————————