नाद खुळा…सलूनमध्ये सोन्याच्या कात्रीने केस कर्तन

0
291

कोल्हापूर, दि. २८ (पीसीबी) : कोल्हापूरकरांच्या हौसेला मोल नसतं याचं प्रत्यय पुन्हा आज अनेकांना आला. तीन महिन्यानंतर सलून व्यवसायाला परवानगी मिळाली. याचा आनंद कोल्हापुरातील एका सलून व्यावसायिकाने चक्क सोन्याच्या कात्रीनं ग्राहकांचे केस कापत साजरा केला. रामभाऊ संकपाळ असे या हौशी सलून व्यावसायिकाचे नाव आहे. रामभाऊ यांच्या या आनंद व्यक्त करण्याच्या अनोख्या पद्धतीने ग्राहकांना देखील आज अनपेक्षित सुख मिळालं.

सोन्याचे दागिने अंगभर घालून मिरवणारे तुम्ही पाहिले असतील. पण सलूनमध्ये सोन्याची कात्री आणि त्याचं कात्रीने ग्राहकांचे केस कापले जातात, असं दृश्य तुम्ही कधी पाहिलयं…नाही ना? पण अस घडलंय नाद खुळा कोल्हापुरात….लॉकडाऊनमध्ये तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर आजपासून राज्यातील सलून व्यवसायाला परवानगी मिळाली. यामुळे सलून व्यवसायिकांना दिलासा मिळाला.

अनेकदा पाठपुरावा आणि आंदोलन केल्यानंतर मिळालेल्या या परवानगीचा आनंद सलून व्यवसायिकांना होणं सहाजिकच होतं. हाच आनंद कोल्हापूरचे सलून व्यावसायिक रामचंद्र संकपाळ यांनी सोन्याच्या कात्रीने ग्राहकांचे केस कापत साजरा केला.सलून सुरू झाल्यामुळे या व्यावसायिकांप्रमाणे ग्राहकांना ही दिलासा मिळाला. म्हणूनच आज सलून उघडण्याआधी काही ठिकाणी ग्राहकांनी सलून दुकानांसमोर हजेरी लावली. पण रामभाऊंच्या दुकानात आलेल्या ग्राहकांना आपले केस सोन्याच्या कात्रीने कापले जात असल्याचं पाहून अनपेक्षित सुख मिळालं.कोल्हापूरकर म्हटलं की वेगळेपण हे आलं. मग त्यासाठी कितीही किंमत मोजायची कोल्हापूरकरांची तयारी असते. म्हणूनच जगात भारी… कोल्हापुरी असं म्हटलं जातं.