‘आई-भावाने केलेल्या मारहाणीतच पीडितेचा मृत्यू…खरे काय ?’

0
376

हाथरस,उत्तर प्रदेश,दि.८(पीसीबी) : हाथरस प्रकरणातील चारही आरोपींनी जेलमधून उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहलं असून त्या पत्रात आपण निर्दोष असल्याचं चारही आरोपिंनी सांगितलं आहे. पत्रात आरोपींनी नमूद केलं आहे की, या आरोपींची पीडितेसोबत मैत्री होती. त्यांचं एकमेकांसोबत बोलणंही होत असे. परंतु, पीडितेला मारहाण आरोपींनी केलेली नाही. तर पीडितेची आई आणि भावाने केलेली आहे. या मारहाणीनंतरच पीडितेचा मृत्यू झाला. पत्रात चारही आरोपी संदीप, रामू, रवी आणि लवकुश यांच्या सह्या आणि अंगठ्याचे ठसेही आहेत.

आरोपींनी पत्रात लिहिलं आहे की, त्यांची पीडितेसोबत मैत्री होती. फोनवरही बोलणं होत असे. याच कारणामुळे त्या दिवशी आई आणि भावाने पीडितेला मारहाण केली होती. त्यानंतर आरोपी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पीडितेला पाणीही पाजलं होतं. परंतु, उलट त्यांनाच या प्रकरणात अडकवण्यात आलं. तसेच असं पत्र लिहून आरोपींनी उत्तर प्रदेश पोलिसांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

हाथरस प्रकरणातील पीडित तरूणीच्या कुटुंबियांनी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल करत दावा केला आहे की, जिल्हा प्रशासनाने अवैध्यरित्या त्यांना घरात डांबून ठेवलं आहे. त्यांची यातून सुटका करण्यात यावी आणि घरातून बाहेर पडण्यास तसेच लोकांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात यावी.’ या याचिकेमध्ये पीडितेच्या कुटुंबियांची बाजू वाल्मिकी समाजासाठी काम करणारी एक संघटना मांडत आहे. पीडितेचे वडील, पीडितेची आई, दोन भाऊ आणि दोन इतर नातेवाईकांनी ही याचिका दाखल केली आहे.

या याचिकेमध्ये आरोप लावण्यात आला आहे की, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने याचिकाकर्त्यांना त्यांच्या घरी अवैध्यरित्या डांबून ठेवलं आणि त्यांना कोणलाही भेटू दिलं नाही. दरम्यान, त्यानंतर काही लोकांना त्यांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली. परंतु, आताही जिल्हा प्रशासन याचिकाकर्त्यांना त्यांच्या इच्छेने घराबाहेर पडू देत नाही.

याचिकाकर्त्यांचा आरोप आहे की, त्यांना लोकांना भेटण्यापासून किंवा बोलण्यापासून रोखलं जात आहे. ज्यामुळे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माहिती मिळवण्याच्या अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे.