आई तुळजाभवानी मातेचा पलंग, पालखी कोठून येते, कोण बनवीते ?

0
933

तुळजापूर,दि.20(पीसीबी) : आई तुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान अतिशय वेगळे असून मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहिल्यास शेकडो वर्षांपासून चालत आलेले रीतीरिवाज आजही कायम आहेत. दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना करू शकत नाही. पलंग, पालखी, बुधलीवाले, भुते, माया प्रताप, बोंबले यासारखी मंडळी नगर, पुणे, नाशिक, सोलापूर यांसारख्या दूरदूरच्या भागातून येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे बजावत असतात. विशेष म्हणजे सर्वांची जगन्माता आई तुळजाभवानी ज्या पालखीत बसून मिरवते व ज्या पलंगावर निद्रा घेते ते तयार करणारे हात एवढे छोटे आहेत की सर्वसामान्यांना काय पण मंदिर प्रशासनालाही त्यांच्या नावाची साधी कल्पनाही नाही. त्याचे कारण म्हणजे सेवा बजावण्याच्या मानपानातील असणारी गुंतागुंत. तसे पाहिले तर देवाचा पलंग असो की पालखी या दोन्ही धार्मिकदृष्ट्या पवित्र असल्याने आपण कुठल्याही मंदिरात गेलो तर वापर झाल्यानंतर त्या वस्तू मंदिरातच कुठे तरी व्यवस्थितपणे सांभाळून ठेवून पुन्हा त्याचा वापर केला जातो. याच्या उलट तुळजाभवानी मंदिरातील पलंग आणि पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही वस्तू एकदा वापर झाल्या की त्या सन्मानपूर्वक तोडून होमात टाकून जाळून टाकल्या जातात.

तसे पाहता श्रीतुळजाभवानीच्या सर्वच प्रथा आणि परंपरा इतर देवस्थानांपेक्षा अतिशय भिन्न आहेत. कारण हिंदू धर्मात तुळजाभवानीच्या मूर्तीशिवाय इतर कुठलीही मूर्ती नसेल जी प्रत्यक्षपणे काढून मूळ मूर्तीलाच पालखीत ठेवून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. शिवाय वर्षातून तीन वेळा मूळ मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपविले जाते.

तुळजाभवानीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुळजापूरमध्ये तेलाचा घाणा चालवायला पूर्वापार परवानगी नाही. मात्र याच तुळजाभवानीला लागणारा पलंग आणि पालखी घेऊन येण्याचा मान नगर जिल्ह्यातील तेल्याचा आहे.

आपण तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात गेल्यानंतर उजव्या हाताला एका ओवरीत देवीचा पलंग दिसतो. त्या पलंगावर देवीची मूळ मूर्ती काढून भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावास्या, अश्विन शुद्ध एकादशी ते पौर्णिमा व पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमीपर्यंत झोपविली जाते. याला देवीची ‘ घोर निद्रा,’ ‘ श्रमनिद्रा ‘ व ‘ भोगनिद्रा ‘, म्हटले जाते. तत्पूर्वी सीमोल्लंघनासाठी हीच मूर्ती पालखीत ठेवून मुख्य मंदिराभोवती मिरविली जाते. विशेष म्हणजे पालखी सीमोल्लंघनानंतर लगेचच तोडून होमात टाकली जाते. तर दसऱ्यानंतरच्या पौर्णिमेदिवशी जुना पलंग होमात टाकून नवा पलंग ठेवला जातो. तुळजापुरातील समाजातील एका घराण्याकडे या पलंगाची सेवा करण्याची परंपरा असल्याने त्याचे आडनाव ‘पलंगे’ पडले आहे. पलंग व पालखी या दोन्ही वस्तू देवीसाठी महत्त्वाच्या असल्या तरी त्या आणण्याचा मान हा अहमदनगरच्या तेली समाजाचा आहे. यातही पुन्हा वेगळेपण म्हणजे तेली मानकरी असले तरी त्या वस्तू वेगवेगळ्या जागी तयार होऊन कशाप्रकारे तुळजापूरपर्यंत पोचतात हा सर्व प्रवासच अनोखा आहे.

तुळजाभवानी देवीचा पलंग घेऊन येण्याचा मान परंपरेने अहमदनगर शहरातील तेली समाजातील पलंगे घराण्याला आहे. सध्या बाबूराव अंबादास पलंगे याचे मुख्य मानकरी असून नगर शहरातील तुळजाभवानी मंदिराचे ते पुजारी आहेत. तुळजापूरप्रमाणे इथेही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. देवीचा पलंग तुळजापूरला घेऊन येण्याचा मान भलेही पलंगे घराण्याला असला तरी तो तयार करण्यासाठी राबणारे हात दुसरेच आहेत. प्रत्यक्षात देवीचा पलंग तयार करण्याचे काम पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील ठाकूर घराणे परंपरेने करते. श्रद्धापूर्वक पलंग तयार करून दिल्यानंतर पुन्हा ठाकूर यांचे काम संपले. बिचाऱ्यांना तुळजापुरात आल्यानंतर त्या पलंगापर्यंत जायचे म्हटले तर त्यांना परवानगी नाही. कारण पलंग तयार केल्यानंतर तो नगरच्या पलंगे नावाच्या तेली समाजातील मानकऱ्याच्या ताब्यात देतो. तेथून तो तुळजापूरच्या दिशेने रवाना होतो.

घोडेगावावरून वाजत-गाजत पलंगाचा प्रवास महिनाभर सुरू असतो. या दरम्यान तो जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, पारनेरमार्गे नगरपर्यंत प्रवास करत असतो. अगदी घटस्थापनेच्या दिवशी पलंग अहमदनगरमधील तुळजाभवानी मंदिरात दाखल होतो. दोन दिवस मुक्काम केल्यानंतर तिसऱ्या माळेला तो नगरजवळील भिंगारच्या मंदिराकडे प्रस्थान करतो.

याचवेळी राहुरी येथे तयार झालेली देवीची पालखी भिंगारमध्ये दाखल होते. अतिशय नयनरम्य सोहळ्यात तेथे पलंग आणि पालखीच्या भेटीचा सोहळा संपन्न होतो. तेथून पुढे तुळजापूरला पलंग घेऊन जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील खुंटेफळ, चिंचोडी पाटील, सय्यदपीर आणि कुंडी या चार गावचे लोक मानकरी म्हणून सोबत असतात. अशारीतीने नगर, भिंगार, जामखेड, आष्टी, भूम, चिलवडी, आपसिंगामार्गे दसऱ्याच्या आदल्यादिवशी तुळजापुरात दाखल होतो.

ज्याप्रमाणे तुळाजाभवानीची मूळ मूर्ती काढून पलंगावर झोपवली जाते त्याचप्रमाणे दरवर्षी सीमोल्लंघन खेळण्याकरिता मूर्तीला पालखीतून मुख्य मंदिर परिसरातून प्रदक्षिणा काढून मिरवले जाते. ही पालखी आणण्याचा मान अहमदनगर शहरालगत असणाऱ्या भिंगार ( बुऱ्हानगर ) गावातील भगत नावाच्या एका तेली घराण्याकडे आहे. पलंगाप्रमाणे पालखी तयार करण्याची कथाही काही वेगळीच आहे. त्यानुसार तुळजाभवानीच्या दरबारात पालखी आणून ती मिरविण्याचा मान जरी भिंगारच्या तेली घराण्याला असला तरी प्रत्यक्षात वेगळ्या ठिकाणी तयार होते. पालखीच्या तयारीची कथाही फारच आगळी आहे.

फार पूर्वी तुळजाभवानीची पालखी नगरजवळील हिंगणगावला तयार व्हायची. पुढे अहिल्यादेवी होळकरांच्या घोगरे नावाच्या सरदारांनी पालखी तयार करण्याचा मान स्वत:कडे घेऊन आपले जहागिरीचे ठिकाण असणाऱ्या राहुरीत ती तयार करण्याची प्रथा सुरू केली. पालखीच्या तयारीतही फारच मानकरी आहेत. त्यानुसार दरवर्षी भाद्रपद प्रतिपदेला पालखीसाठी लागणारे लाकूड राहुरीच्या म्हेत्रे म्हणजे माळी घराण्याकडून येते. कदमांकडून पालखीसाठीचे उभे लाकूड ज्याला शिपाई म्हटले जाते तेच फक्त देण्यात येते. पालखीच्या खालच्या बाजूला बोरीचे लाकूड तर इतर लाकूड पूर्णपणे सागवानाचे असते. ते राहुरीतील पटेल सौमीलवाले द्यायला लागले. खांद्यासाठीचा मोठा दांडा असतो तो जुनाट वापरला जातो. पालखीचे लाकूड मिळाल्यानंतर ती तयार करण्याचा मान राहुरीतील कै. उमाकांत सुतारांच्या घराण्याला आहे.

या वेळी लाकडाची कतई करण्याचे काम धनगर समाजातील भांड घराणे करते. तर लोहाराचे रणसिंग घराणे खिळेपट्टी करते. अशा रीतीने पालखी तयार झाली की तिची सुताराकडून विधिवत् पूजा करून तेली समाजातील धोत्रे घराणे पालखीला राहुरीतील तुळजाभवानी मंदिरात घेऊन जातात. या वेळी दिवे कुंभार पुरवितो तर तेली तेल देतो. खाली घोंगडी अंथरण्याचे काम धनगर करतो. राहुरीतील तुळजाभवानी मंदिराकरिता धोंडी घोगरे यांनी स्वत:ची जागा दान केलेली आहे. देवीचे पूजारीपण धोत्रे नावाच्या तेल्याकडे आहे. भाद्रपद पौर्णिमेला पालखी नगरजवळील भिंगार गावाकडे रवाना होते. ती नदीपार करून देण्याचा मान कोळी समाजाला आहे. या वेळी ढोर आणि चांभार समाज मशाल धरतात. सुपा, पारनेर, हिंगणगाव, नगरमार्गे ४० गावांतून तिसऱ्या माळेला पालखी भिंगारगावात दाखल होते.

त्या ठिकाणी घोडेगावावरून बनविण्यात आलेला पलंग दाखल होतो. घटस्थापनेच्या तिसऱ्या दिवशी भिंगारमध्ये पलंग-पालखीची अभूतपूर्व भेट झाल्यानंतर ते दोघे तुळजापूरच्या दिशेने रवाना होतात. जामखेड, आष्टी, भूम, चिलवडी, अपसिंगामार्गे सतत २४ तास पलंगाचा प्रवास पूर्ण होऊन दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी पलंग तुळजापुरात दाखल होतो. पूर्वी पालखीही याच पद्धतीने यायची, मात्र अलीकडे ती गाडीतून थेट दाखल होते. पलंग आणि पालखी टेकविण्याकरिता तुळजापुरातील शुक्रवार पेठेत स्वतंत्र ओट्याची व्यवस्था केलेली आहे.

रात्री उशिरा पलंग आणि पालखीची गावातून स्वतंत्रपणे मिरवणूक निघते. अगदी पहाटेच्या सुमारास पलंग आणि पालखी तुळजाभवानी मंदिरात दाखल होतात. देवीचे सीमोल्लंघन हे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्योदयाबरोबर होत असल्याने मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. याच वेळी मंदिरातील भोपे पुजारी देवीला १०८ साड्यांचे वेश्टण गुंडाळून पालखीत ठेवतात. तेव्हा बार्शी तालुक्यातील आगळगाव व गोमाळ्याचे लोक पालखीला खांदा देऊन अगदी पाच मिनिटांत मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालतात तेव्हा अपसिंग्याचा डांगे देवीवर छत्री धरतो. माया मोर्तबचा मुखवटा कर्गनचा क्षीरसागर तेली, कर्जतचा सुतार, दिवटी घेऊन देवीपुढे चालतात. तर राहुरीचे मुसलमान पलंगाच्या पुढे वाजवत तो मुख्य मंदिरापुढे आणून ठेवतात.

देवीची एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखीतून उचलून देवीला पलंगावर झोपविण्यात येते. तेव्हा हा पलंग देवीच्या मुख्य गाभाऱ्यात ठेवण्यात येतो. पालखीची मिरवणूक झाली की अगदी विधिपूर्वक त्याचे वरचे दांड काढून पालखी मोडून होमात टाकली जाते. तर पुढील पौर्णिमेपर्यंत म्हणजे ४ दिवस पलंगावर झोपल्यानंतर पुन्हा देवीजीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर पौर्णिमेला पलंग तोडून तोही होमात टाकून नष्ट केला जातो. अगदी सन्मानपूर्वक पलंग आणि पालखीचा प्रवास पुणे आणि नगर जिल्ह्यात सुरू होऊन मंदिरात समाप्त होतो. फक्त देवीची सेवा म्हणून नि:शुल्कपणे नगर आणि भिंगारचे तेली देवीच्या चरणी आपली चाकरी अखंडपणे पुढे चालवत आहेत