देशात महाराष्ट्राची आता कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल वेगात

0
339

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – देशातील सर्व राज्यांचा विचार करता जिथे महाराष्ट्र हा सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेला म्हणून हिनवले गेले तिथे आता कोरोना मुक्तीच्या दिशेने या राज्याची झपाट्याने वाटचाल सुरू आहे. रोजचे कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण जवळपास तिप्पट आहे.

देशातली कोरोना संसर्गाचा वेग जरी काहीसा मंदावला असला, तरी देखील अद्याप कोरोनाबाधित मोठ्या संख्येने आढळत आहेत. शिवाय, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडत असल्याचे दिसत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ४६ हजार ७९१ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७५ लाख ९७ हजार ६४ वर पोहचली आहे. समाधानाची बाब म्हणजे दैनंदिन सुमारे ९० हजार रुग्णवाढ आता ५५ हजारांवर आली असून रुग्णवाढीचा वेग कमी होऊ लागला आहे. देशात सोमवारी (१९ ऑक्टोंबर) कोरोना बाधितांमध्ये नवीन ४५ हजार ४९० रुग्णांची भर पडत असताना दुसरीकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६९ हजार ८०० होते.

देशातील राज्य निहाय परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील कोरोना रुग्णंची वाढ वेगाने कमी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात सोमवारी ५ हजार ९८४ नवीन रुग्ण आढळले, पण बरे होणारे १५ हजार ६९ होते. तुलनेत शेजारील अन्य राज्यांतील परिस्थिती अद्याप नाजूक आहे. दैनंदिन अहवालानुसार कोरोना बाधित आणि बरे झालेल्या (कंसातील) संख्या पाहता कर्नाटक – ५०७८(८००४), तमिळनाडू – ३,५३६ (४५१५), आंध्रप्रदेश -२,९१८ (४३०३), केरळा -५,०२२(७,४६९), दिल्ली -२,१५४ (२,८४५), उत्तर प्रदेश -१,७१९ (३,०९३).

देशात कोरोनाचे शिखर पार केल्याचे आणि आगामी चार महिन्यांत कोरोना आटोक्यात येऊ शकेल, असे निरीक्षण केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने नेमलेल्या दहा सदस्यांच्या समितीने गणिती प्रारूपाच्या आधारे नोंदवले आहे. या समितीने आकडय़ांच्या स्वरूपात त्याची माहिती दिलेली नव्हती. मात्र, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याच समितीच्या अहवालाचा आधार घेत कोरोना रुग्णांच्या संख्येचा अंदाज मांडला. दैनंदिन सुमारे ९० हजार रुग्णवाढ आता ५५ हजारांवर आली असून रुग्णवाढीचा वेग कमी होऊ लागला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये हा वेग पुन्हा वाढणार नाही याची सरकार दक्षता घेईल, असेही हर्षवर्धन यांनी पत्रकारांना सांगितले.