‘असल्या 56 चित्रा वाघ आल्या तरी फरक पडत नाही. मांजरीला आणि बोक्यांना घाबरत नाही’; महेबूब शेख यांचं उत्तर

0
501

औरंगाबाद, दि.०७ (पीसीबी) : राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आणि भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक युद्ध आता सुरुच आहे. कालच्या संघर्षानंतर चित्रा वाघ यांनी आज पुन्हा ट्विट करुन महेबूब शेख यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला महेबूब शेख यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. “असल्या 56 चित्रा वाघ आल्या तरी मला फरक पडत नाही आणि असल्या मांजरीला आणि बोक्यांना मी घाबरत नाही”, असा पलटवार महेबूब शेख यांनी केलाय.

चित्रा वाघ यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर टीका केली होती. मेहबूब शेख पारनेर दौऱ्यावर असताना त्यांनी चित्रा वाघ यांना ‘लाचखोर नवऱ्याची बायको’ म्हणत ‘आधी नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा, मग आम्हाला शिकवा’, असा सल्ला चित्रा वाघ यांना दिला होता. त्यानंतर चित्रा वाघ आणि मेहबूब शेख यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

“तुम्ही काहीही म्हटलं तरी तुमची ओळख लाचखोर नवऱ्याची बायको हीच आहे. लाचखोर नवऱ्याच्या बायकोचं नाव वाघ असल्यामुळे मांजर वाघ होत नाही. आपल्या नवऱ्याने कशात आणि कोणत्या प्रसंगात लाच घेतली यावर अधिक स्पष्टपणे तुम्ही बोला”, असं मेहबूब शेख चित्रा वाघ यांना उद्देशून म्हणाले. “मेलेल्या माणसाच्या वारसांना नोकरी आणि मदत देण्यासाठी किशोर वाघ यांनी लाच घेतली, हे तुम्ही राज्यातील जनतेला सांगा”, असंही महेबूब शेख म्हणाले.

“त्या स्वत:ला वाघ म्हणवतात. पण मांजर वाघ होत नसते. असल्या खोटारड्या वाघासोबत माझा मुलगा रोज खेळत असतो. चित्रा वाघ काय आहेत हे मला नीट माहिती आहे. त्यांची बरीच प्रकरणं मी बाहेर काढणार आहे”, असा इशाराही महेबूब शेख यांनी दिला.

“मी काय आहे, हे तुमच्या बापाला जाऊन विचारा”, असं काल चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. त्यांच्या या टीकेवर देखील महेबूब शेख यांनी उत्तर दिलं आहे. “बाप बदलणाऱ्या लोकांनी आमच्या बापाबद्दल बोलू नये. तुम्ही काय आहेत आणि कशा आहेत, हे मला चांगलं माहिती आहे”, असं ते म्हणाले.

“आम्ही पवारांचे कार्यकर्ते आहोत म्हणून काही बंधने पाळतो नाहीतर असल्या 56 चित्रा वाघ आल्या तरी त्याच्या पुढची भाषा महेबूब शेख बोलू शकतो, आणि महेबूब शेख कशालाच घाबरत नाही”, असं म्हणत महेबूब शेख यांनी संघर्षाला तयार असल्याचं एकप्रकारे सांगितलं आहे.

दरम्यान, पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले. परंतु मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं.

“चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला.

कालपासून मेहबूब शेख आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडियावर जोरदार सामना रंगलाय. एकमेकांच्या आरोप-प्रत्यारोपांवर दोघेही वार-प्रतिवार करतायत. एकंदरित या दोघांमध्ये येत्या काळात जोरदार संघर्षाची शक्यता आहे