अशोक चव्हाण यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर

0
447

मुंबई, दि. ३ (पीसीबी) –  लोकसभेतील दारूण पराभवामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा पक्षश्रेष्ठींनी मंजूर केला आहे.  त्यामुळे आता विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती  काँग्रेसमधील सूत्रांकडून समजते. 

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम  आहेत. तर विविध राज्यातील   काँग्रेस नेत्यांनी आपल्या पदाचे  राजीनामा सत्र सुरु केले आहे. अशोक चव्हाण यांनीही राज्यातील पराभवाची व स्वत:च्या पराभवाची जबाबदारी स्विकारून काही दिवसांपुर्वी राजीनामा दिला होता. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र ते राजीनाम्यावर ठाम असल्याने दोन दिवसांपुर्वीच त्यांचा राजीनामा स्वीकारला, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना संधी मिळणार आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी थोरात यांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. थोरातांसोबतच तीन ते चार नेत्यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या समाजातील नेत्यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे.