रोहीत पवार ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार; उमेदवारी मिळण्यासाठी केला अर्ज

0
547

पुणे, दि. ३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहीत पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची तयारी केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्षांकडे उमेदवारी मिळण्याबाबत अर्ज दिला आहे. 

रोहित पवार  यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे अर्ज केला असून त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. सध्या कर्जत-जामखेड   मतदारसंघाचे प्रतिनिधी  कॅबिनेट मंत्री राम शिंदे करत आहेत. त्यामुळे रोहित पवार यांना जर कर्जत-जामखेडमधून उमेदवारी मिळाली, तर शिंदे विरुद्ध पवार अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधानसभा लढवण्यास मी इच्छुक  आहे. मात्र,  माझा मतदारसंघ ठरला नसून  पक्षाचे नेते  सांगतील, तिथून  निवडणूक लढवेल, असे रोहित पवार यांनी म्हटले होते.  रोहीत पवार यांनी मतदारसंघातील दुष्काळी भागात  टँकर सुरु करुन जनसंपर्क वाढवण्याचाही प्रयत्न केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता.