अविनाश चिलेकर यांनी परखड पत्रकारितेचा वारसा जपला: संभाजी महाराज मोरे

0
60

पिंपरी : बदलत्या काळात पत्रकारितेचा वसा प्रामाणिकपणे जोपासण्याचे काम नव्या पिढीने करावे. त्याचा फायदा सक्षम समाजनिर्मितीसाठी होईल, जेष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनी सडेतोड आणि परखड पत्रकारितेचा वारसा पुढे नेला आहे, असे मत संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज आणि देहू संस्थानचे माजी विश्वस्त संभाजी महाराज मोरे यांनी केले.

पीसीबी टूडेचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांच्या षष्ठ्यब्दी सोहळ्यानिमित्त ताथवडे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लांडगे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सीमा सावळे, जेष्ठ नेते सारंग कामतेकर, ज्येष्ठ पत्रकार नेताजी मानकर, विवेक इनामदार, पावलस मुगुटमल, दीपक मुनोत, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष रवी नामदे, परमानंद जमतानी, मारुती बहिरवाडे, माधव पाटील, वासंती चिलेकर, तेजस पाटील या वेळी उपस्थित होते.
….
रोख- ठोक अंक आणि मानपत्र
कार्यक्रमात मोरे महाराज यांनी रोख- ठोक अंक प्रकाशन केले आणि मानपत्र देण्यात आले. तसेच संत तुकाराम महाराज यांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. विवेक इनामदार यांनी आठवणींना उजाळा दिला. रोख- ठोक अंकाचे संपादन वासंती चिलेकर यांनी केले आहे. त्यात सामनाकार संजय राऊत यांच्यासह पत्रकारिता, समाजकारण, राजकारणातील मान्यवरांनी लेख लिहले आहेत.

मोरे महाराज म्हणाले, ”पत्रकारिता क्षेत्रातील चिलेकर यांचे योगदान दीपस्तंभासारखे आहे, शहराच्या विकासात राजकीय आणि प्रशासनचा महत्त्वाचा वाटा असतो. त्याचप्रमाणे शहराच्या वैचारिक जडणघडणीत पत्रकारांचा मोठा वाटा असतो. चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक करणे आणि चुकीच्या काम करणाऱ्यांना लेखणीच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचे काम लोकशाहीचा चौथा स्तंभ करीत असतो. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी, या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे काम करण्याची नितांत आवश्यकता आहे. सामाजिक संवेदना जागृत ठेवून जागल्याच्या भूमिकेत लेखणीने प्रहार करून चिलेकरांनी नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवून भविष्यात वाटचाल करण्याची गरज आहे.”

सीमा सावळे म्हणाल्या, ”पत्रकारिता क्षेत्रात चिलेकर सर यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी आमच्या सारखी पिढी घडविली आहे. या शहराच्या विकासात त्याचे बहुमोल असे योगदान आहे. आम्ही विरोधात असताना आमचा आवाज बनण्याचे काम केले. आणि आम्ही सत्तेवर आल्यानंतर जनतेचा आवाज बनले. जनतेचा आवाज बनून त्यांनी भूमिका मांडली आहे.”
….
विवेक इनामदार यांनी प्रास्ताविक केले. अनिकेत चिलेकर यांनी सूत्रसंचालन केले. अमृता चिलेकर यांनी आभार मानले.