“अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला तर त्यांना देहदंडाची शिक्षा करावी”

0
387

मुंबई, दि.२४ (पीसीबी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या अनेक घटना समोर येत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतील साकीनाकामध्ये झालेल्या घटनेनंतर डोंबिवली, सातारा, कल्याण येथूनही लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना या घटनांवर संताप व्यक्त केला असून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. ‘एबीपी’ माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं मत माडंलं.

“आपल्या राज्यात, देशात आणि संस्कृतीत महिलांना पूज्यनीय स्थान देण्यात आलं आहे. माझ्या पहिल्या भाषणापासून मी महिला अत्याचारावर भाष्य करत आहे. महिला अत्याचारामधील घटनांमध्ये शिक्षेचं प्रमाण वाढावं, त्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला तर त्यांना देहदंडाची शिक्षा करावी अशी मागणी आम्ही लावून धरली होती. पण आजचं जे चित्र आहे ते थोडंसं विदारक दिसत आहे,” असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

“या घटनांनंतर संताप व्यक्त केला जातो पण खरं काम पोलिसांचं आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट तयार झाले असून पोलिसांच्या यंत्रणा तात्काळ राबवल्या पाहिजेत जेणेकरुन आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी शिक्षा झाली पाहिजे की परत कोणी महिलेला स्पर्श करण्याचा आणि त्रास देण्याचा, वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही झाली पाहिजे,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

करुणा शर्मा प्रकरणावर ट्वीट करताना पंकजा मुंडे यांनी चुकीच्या लोकांच्या हातात ताकद असल्याचा उल्लेख केला होता. यासंबंधी बोलताना त्यांनी म्हटलं की, “जेव्हा आपण राजकारणात पराक्रमी या शब्दाशी जोडलो जातो, आणि तो जेव्हा हात बांधतो तेव्हा व्यवस्था कोलमडते. म्हणजे चुकीच्या घटना घडल्याने व्यवस्था कोलमडत नाही, तर चुकीच्या घटनांवर आपण ज्या पद्धतीने व्यक्त होतो त्यामुळे ती कोलमडते. त्यामुळे मला आत्ताचं राजकारण सभ्य म्हणायला नकोसं वाटतं”.

“राजकारणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन फारसा सकारात्मक नाही. त्यात आपण राजकीय संस्कृतीचे ट्रेंड जे निर्माण होत आहेत ते भविष्यासाठी फारसे चांगले नाहीत,” असं पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं.