“जो पर्यंत भर चौकात खून होत नाही तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होत नाही”

0
654

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे दबंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना चार दिवसांमध्ये घडलेल्या सहा खुनाच्या घटनांचे गांभीर्य नसल्याचं पाहायला मिळत आहे. खुनाच्या घटना वाढल्या नाहीत, त्या कमीच आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच, जोपर्यंत भर चौकात खून होत नाही तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होत नाही. या सामाजिक घटना नाहीत असं विधान पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलं आहे.

कृष्ण प्रकाश म्हणाले की, खुनाच्या घटना वाढल्या नाहीत, कमीच आहेत. खून व्हायला नाही पाहिजेत, या मताचा मी आहे. नागरिकांच्या समोर भर चौकात खून होत नाही तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकत नाही. आत्ता झालेल्या खुनाच्या घटना या सामाजिक नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, शहरात कामगार वस्त्या आणि कामगार भरपूर आहेत. अनलॉकनंतर बाहेरील लोक कामासाठी आले. त्या लोकांमध्ये वाद विवाद होतात यातून अशा घटना घडत आहेत. त्यामुळं समाजात भीती बाळगण्याचे कारण नाही. या घटना व्यक्तिशः आहेत, असं म्हणत त्यांनी आपली जबाबदारी झटकली आहे. पुढे ते म्हणाले की, अशा घटना कायद्याच्या भीतीने संपत नाहीत. कायदा अवगत असेल तर भीती असते. रागात नसतो तेव्हा कायद्याची भीती असते अशी उदाहरणे त्यांनी दिली आहे.

गेल्या ४ दिवसांमध्ये खुनाच्या ६ घटना…
१) २० सप्टेंबर निगडी येथे संपत गायकवाड यांचा खून करण्यात आला तीन अल्पवयीन मुलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

२) घोराडेश्वर येथे वहिनीचा मित्राच्या मदतीने दिराने खून करत बलात्कार करण्यात आला. दिराला बेड्या ठोकण्यात आल्या असून मुख्य आरोपी अक्षय कारंडे हा फरार आहे.

३) २१ सप्टेंबर रोजी चिखली येथे वीरेंद्र उमरगी याचा खून करण्यात आला असून आरोपी मोकाट आहेत. चिखली पोलीस तपास करत आहेत.

४) त्याच दिवशी पत्नीला अपशब्द वापरल्याने मित्राने मित्राचा खून केला. अच्युत भुयान असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून कमल शर्मा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही हिंजवडी पोलिसांची कामगिरी आहे.

५) २२ सप्टेंबर रोजी रावेत येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने खून केला आहे. खैरूनबी नदाफ अस खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी फरार आहे. रावेत पोलीस तपास करत आहेत.

६) २३ सप्टेंबर रोजी रोहन कांबळे नावाच्या तरुणाचा खून करण्यात आला आरोपी मोकाट आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.

-२०१८ या वर्षात ७२ खून झाले आहेत

-२०१९ या वर्षात ६८ खून झाले आहेत

-२०२० या वर्षात ७१ खून झाले आहेत

-२०२१ या चालू वर्षात म्हणजे ९ महिन्यात ४८ खून झाले आहेत.