अयोध्येबद्दल दिवाळीत चांगली बातमी ऐकायला मिळेल – उत्तर प्रदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष

0
418

नवी दिल्ली, दि.३ (पीसीबी) – अयोध्येत राम मंदिर उभारण्यावरुन विरोधकांकडून वारंवार केंद्र सरकारवर टीका होत असताना उत्तर प्रदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. अयोध्येबद्दल दिवाळीत चांगली बातमी एकायला मिळेल असे त्यांनी म्हटले आहे.

‘योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असण्यासोबतच एक मोठे संत आहेत. नक्कीच त्यांनी अयोध्येसाठी धोरण आखले असणार. दिवाळी येऊद्या आनंदाची बातमी मिळण्याची वाट पहा. मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच ही योजना समोर आली तर योग्य होईल,’ असे महेंद्रनाथ पांडे यांनी म्हटले आहे.

याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत आपण एक चांगली बातमी घेऊन जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर लगेचच महेंद्रनाथ पांडे यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. अयोध्येची सुनावणी जानेवारी महिन्यात होण्यासंबंधी विचारले असता योगी आदित्यनाथ यांनी अनेकदा अन्यायामुळे न्याय मिळण्यास उशीर होतो अशी प्रतिक्रिया दिली होती.