अमेरिकेत ७.८ रिस्टर स्केलचा भूकंप

0
540

अलास्का दि. २२ (पीसीबी) – अमेरिकेतील अलास्काच्या समुद्रकिनाऱ्याजवळ ७.८ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू असणाऱ्या ठिकाणापासून ३०० किमी परिघामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त असोसिएट फ्री प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

अमेरिकेतील भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अँकोरेजपासून ५०० मैलांवर बुधवारी सहा वाजून १२ मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजून ४२ मिनिटांनी) सौम्य स्वरुपाचा भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर पेरीवीलपासून ६० मैलावर पुन्हा भूकंपाचा मोठा धक्का बसला. “प्राथमिक भूकंपाच्या निकषांनुसार भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून ३०० किमीच्या परिघामध्ये धोकादायक त्सुनामी लाटा उसळण्याची शक्यता आहे,” असं पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने म्हटलं आहे.

अलास्काच्या द्वीपकल्पापासून ते थेट दक्षिण अलास्कापर्यंत त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. “अमेरिका तसेच कॅनडाच्या समुद्रकिनाऱ्यांबरोबरच उत्तर अमेरिकेतील समुद्र किनाऱ्यांना त्सुनामीचा किती धोका आहे यासंदर्भातील तपासणी सुरु आहे,” असं पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने नमूद केलं आहे.

शेकडो मैल परिसरामध्ये या भूकंपाचे धक्क जाणवले. “घरांमधील वस्तू जोरजोरात हलत होत्या. बराच काळ हा भूकंप जाणवत होता,” असं अलास्कापासून ४०० मैलांवरील भूकंपाचे केंद्रबिंदू असणाऱ्या परिसरातील स्थानिकांनी सांगितले. यासंदर्भातील वृत्त भूकंपाशी संबंधित एमएससी सीएसईएम डॉट ओआरजी या वेबसाईटने दिलं आहे.

अलास्का हा प्रदेश पॅसिफिक रिंग ऑफ फायरच्या भौगोलिक प्लेटचा भाग आहे. १९६४ साली अलास्कामध्ये ९.२ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला होता. उत्तर अमेरिकेमध्ये नोंदवण्यात आलेला हा सर्वात मोठा भूकंप होता. या भूकंपामुळे अँकोरेज उद्धवस्त झालं होतं. तर अलास्काच्या आखाती भागाबरोबरच अमेरिकच्या उत्तरेकडील समुद्रकिनाऱ्यांवर आणि हवाई बेटांवर त्सुनामी लाटा धडकल्या होत्या. या भूकंपामध्ये २५० हून अधिक जणांना प्राण गमवावा लागला होता.