अभ्यास न केल्याने सांगवीत ६ वर्षीय मुलीला शिक्षकांकडून बेदम मारहाण

0
1130

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – स्कूल बसमध्ये झालेल्या वादातून एका १३ वर्षीय मुलाला आकुर्डीतील शाळेतील शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असताना युकेजीच्या ६ वर्षीय मुलीने अभ्यास केला नाही, म्हणून त्या मुलीला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार पिंपळे गुरव येथील वाचेसु अभिलाषा फेरिटल या शाळेत घडला आहे.

या प्रकरणी शिक्षक विकास दत्ता गायकवाड यांच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. देविका दीपक पवार (वय ६ रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) असे मारहाण झालेल्या मुलीचे नांव आहे.   कोमल दीपक पवार (वय २५ कानिफनाथ बिल्डिंग, लेन नंबर २ लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील वाचेसु अभिलाषा फेरिटल या शाळेत देविका पवार ही युकेजी मध्ये शिकत आहे. गुरूवारी  (दि. २५) देविका हिने शाळेतील अभ्यास केला नाही, म्हणून शिक्षक विकास गायकवाड यांनी तिच्या गालावर चापट लगावली. तसेच प्लॅस्टीक पट्टीने हातावर आणि पायावर मारहाण केली. अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.